जनावरांच्या लिलावात नवा विक्रम !
ब्राझिलिया (ब्राझील) – भारतात गायींचे सरासरी मूल्य २ सहस्र ५०० रुपये ते ११ सहस्र रुपये आहे; पण दक्षिण अमेरिकी देश असलेल्या ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय तब्बल ४० कोटी रुपयांना विकली गेली. नुकत्याच झालेल्या जनावरांच्या एका लिलावात हा नवा विक्रम स्थापित झाला आहे. ही गाय आंध्रप्रदेशातील नेल्लोर येथील ‘वियाटिना-१९ एफ्.आय.व्ही. मारा इमोव्हिस’ या जातीची आहे. ब्राझीलमध्ये लिलावाच्या वेळी ही गाय ४८ लाख डॉलर्स, म्हणजेच ४० कोटी रुपयांना विकत घेण्यात आले.
सौजन्य Kisan Tak
पांढर्या रंगाच्या आणि खांद्यावर विशिष्ट कुबड असलेल्या मूळच्या भारतीय असलेल्या या जातीच्या गायीची ब्राझीलमध्ये मोठी मागणी आहे. या जातीचे शास्त्रीय नाव ‘बॉस इंडिकस’ आहे. शास्त्रज्ञांच्या मते या जातीची गाय तिच्या शक्तीसाठी ओळखली जाते, तसेच ती स्वतःला पर्यावरणाशी जुळवून घेते. ही जात प्रथम वर्ष १८६८ मध्ये ब्राझीलला नौकेने पाठवण्यात आली होती. १९६० च्या दशकात आणखी अनेक गायी तिथे हलवण्यात आल्या. त्यांच्या सशक्त चयापचयामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा त्रास होत नाही. ब्राझीलमध्ये उष्ण हवामान पहाता, तिथे या गायीला पसंती आहे. त्यामुळेच ब्राझीलमध्ये एकूण गायींच्या संख्येत ८० टक्के याच जातीच्या गायी आहेत.