कराड येथे अवैध पशूवधगृहावर पोलिसांची कारवाई !

५० हून अधिक गोवंशियांची सुटका

प्रतिकात्मक छायाचित्र

कराड, २९ मार्च (वार्ता.) – येथील गुरुवार पेठेतील मंडई परिसरात चालू असलेल्या अवैद्य पशूवधगृहावर पोलिसांनी कारवाई करत ५० हून अधिक गोवंशियांची सुटका केली, तसेच जनावरांचे मांस कह्यात घेऊन त्याचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहे. मंडई परिसरात अवैध पशूवधगृह चालवले जात असल्याच्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाकडून काही दिवसांपासून या ठिकाणी पहाणी करण्यात येत होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर यांच्या पथकासह कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या संयुक्त पथकाने २९ मार्चला पहाटे अवैध पशूवधगृहावर धाड घालत काही जणांना कह्यात घेतले. या वेळी मंडई परिसरासह शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुटका करण्यात आलेले गोवंश करवडी येथील ‘भगवान महावीर गोशाळे’त अधिवासासाठी ठेवण्यात आले आहेत.

अवैध पशूवधगृहे कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत ! – सुनील पावसकर, अध्यक्ष, गोरक्षण बचाव समिती, कराड

अवैध पशूवधगृहावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आम्ही अभिनंदन करतो. शहराच्या मध्यवस्तीमध्ये वर्षानुवर्षे चालू असलेल्या अवैध पशूवधगृहासारखी गंभीर गोष्ट कराड नगर परिषदेच्या निदर्शनास आली नव्हती का ? नगर परिषदेने यापूर्वीच अशी कारवाई करणे अपेक्षित होते. प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेऊन तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व अवैध पशूवधगृहे कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत, अशी सर्वत्रच्या गोप्रेमींची अपेक्षा आहे.

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोतस्करी चालूच आहे. यातून कायद्याचे अथवा पोलिसांचे कोणतेच भय गोतस्करांना वाटत नाही, हे लक्षात येते. पोलीस धाक कधी निर्माण करणार ?