३१ मार्चपर्यंत महावितरणची वीजदेयक भरणा केंद्रे चालू रहाणार !


सातारा, २९ मार्च (वार्ता.)
– चालू आणि थकित वीजदेयकांचा भरणा करणे आता ग्राहकांना सोयीचे होणार आहे. सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील महावितरणची अधिकृत वीजदेयके भरणा केंद्रे ३१ मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत चालू रहाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीजदेयके वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण आस्थापनाकडून करण्यात आले आहे.

सध्या महावितरणकडून थकबाकी असणार्‍या ग्राहकांच्या वीजजोडण्या खंडित करण्याचे काम वेगाने चालू आहे. त्यामुळे थकबाकी, तसेच चालू वीजदेयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकित रक्कम किती आहे ? हे न पहाताच नियमानुसार वीजजोडणी तोडण्यात येत आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी, नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा टाळण्यासाठी, वीज नसल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी थकित वीजदेयकांचा तत्परतेने भरणा करावा.

ग्राहकांना कधीही आणि कुठूनही ऑनलाईन पद्धतीने थकित आणि चालू वीजदेयक भरणा करण्याची व्यवस्थाही महावितरणकडून करण्यात आली आहे, तसेच ‘ॲप’द्वारेही ग्राहक भरणा करू शकतात. ५ सहस्र रुपयांहून अधिक रकमेचे वीजदेयक असणार्‍या ग्राहकांना आर्.टी.जी.एस् किंवा एन्.ई.एफ्.टी. यांद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील वीजदेयकावर प्रकाशित करण्यात आला आहे. वीजदेयक भरण्यासाठी ग्राहकांनी www.mahadiscom.in  या संकेतस्थळाचे साहाय्य घ्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.