पनवेल – रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे २९ मार्च या दिवशी निधन झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या. वर्ष १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. वर्ष १९९५ मध्ये त्या निवडून आल्यावर प्रभावीपणे काम करून मतदारसंघातील अनेक प्रश्न तडीस लावले. विरोधात राहूनही सत्ताधारी पक्ष समवेत चांगले संबंध निर्माण करीत विकास निधी आणण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी कोकणातील बंदरे विकासासाठी विशेष प्रयत्न केले. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी येथील अनेक प्रश्न मार्गी लावले. विविध संस्थांवर त्यांनी काम केले. सरकारच्या विरोधात काम केल्याने त्यांना तुरुंगवासही झाला होता. विधीमंडळात आरंभीपासूनच आक्रमक भूमिका स्वीकारत त्यांनी त्यांचा बाणा दाखवून दिला.