आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचे विधान !
लंडन (ब्रिटन) – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये मोठी घडामोड पहायला मिळाली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी भारतासमवेत व्यापार पुन्हा चालू करण्याची इच्छा व्यक्त केली. वर्ष २०१९ मध्ये भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रहित केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतासमवेतचा व्यापार बंद केला. यामुळे सर्वाधिक हानी पाकिस्तानी व्यावसायिकांचीच झाली असून त्यांना भारतीय बाजारपेठेचा लाभ घेता येत नाही.
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे अणुऊर्जा शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर लंडनमध्ये पत्रकार परिषदेत डार यांनी भारतासमवे व्यापार चालू करण्याविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, पाकिस्तानात अजूनही भारतातून माल येतो, असे व्यापार्यांनी सांगितले. ते सिंगापूर आणि दुबईमार्गे पाकिस्तानात पोचते, जे फार महाग आहे. पाकिस्तानी व्यापारी भारतासमवेत व्यापार करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे आम्ही भारतासमवेत व्यवसाय करण्याचा गांभीर्याने विचार करत आहोत. व्यवसाय चालू करण्यासाठी ‘होय’ किंवा ‘नाही’ असे उत्तर मी थेट देऊ शकत नाही.
भारत-चीन व्यापार करू शकतात, तर पाकनेही भारतासमवेत व्यापार करावा ! – पाकिस्तानी व्यापारी
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तानला कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जावे लागते. ‘पाकिस्तानला आर्थिक स्थिती सुधारायची असेल, तर भारतासमवेत व्यापार चालू करायला हवा’, असे अनेक पाकिस्तानी तज्ञ सांगत आहेत. भारतातून वस्तू स्वस्तात खरेदी करता येतात. त्यासह भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे, ज्याचा लाभ पाकिस्तान शेजारी असूनही घेऊ शकत नाही. पाकिस्तानच्या ‘निशात ग्रुप’चे अध्यक्ष मियां महंमद मंशा यांनी गेल्या वर्षी म्हटले होते की, जर चीन-भारत सीमा विवाद असूनही ते दोघे एकमेकांच्या देशांत व्यापार करू शकत असतील, तर भारत-पाकिस्ताननेही व्यापार करायला हवा.
संपादकीय भूमिकापाकने भारतासमवेतचा व्यापार स्वतःहून बंद केला आहे. त्यामुळे भारतासाठी, तर सुंठी वाचून खोकला गेल्यासारखे असल्याने पाकला आता कितीही वाटले, तरी भारताने पाकशी पुन्हा व्यापार चालू करू नये. त्याच्यासाठी सध्या तरी हीच शिक्षा मोठी आहे ! |