हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या सनातनच्या आश्रमांत चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती अनेक साधकांना येतात. आश्रमांमधील स्वयंशिस्त, नियोजनबद्धता, प्रेमभाव आदींमुळे आश्रम भावी हिंदु राष्ट्राची (रामराज्याची) प्रतिकृती भासतात.
साधकांना साधनेसाठी अनुकूल वातावरण मिळण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती केली आहे. त्यांच्या प्रेरणेतून रामनाथी (गोवा), देवद (पनवेल), मिरज (सांगली) आदी ठिकाणी असलेल्या आश्रमांतून अनुमाने ८०० हून अधिक साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. या आश्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे आश्रमात रहाणारे सर्व साधक विविध योगमार्गांनुसार साधना करणारे आणि विविध जातीपंथांचे असूनही आनंदाने अन् प्रेमाने सहजीवन जगतात. आज भारतात कधी नव्हे एवढा जातीद्वेष निर्माण झाला असूनही सनातनच्या आश्रमांतील जातीनिरपेक्षता ठळकपणे दिसणारी आहे. प्रत्येक जण अन्य साधकाकडे ‘गुरुबंधू’ वा ‘गुरुभगिनी’ या भावाने पहातो. त्यामुळे सनातन आश्रम हे शेकडो सदस्यांचे एक कुटुंबच बनले आहे. ईश्वरप्राप्तीच्या ध्येयामुळे एकसंध समाज निर्माण करता येतो आणि रामराज्याची अनुभूती घेता येते, याचे प्रात्यक्षिकच परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनच्या आश्रमांतून दाखवून दिले आहे. साधकांना साधनेला अनुकूल वातावरण पूर्णवेळ उपलब्ध व्हावे, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी विविध ठिकाणी सनातन आश्रमांची निर्मिती केली आहे. येथे साधक आनंदी आश्रमजीवनाचा लाभ घेत आहेत.
सनातनच्या विविध आश्रमांत चालू असलेले राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित कार्य
सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा येथे ‘सनातन संस्थे’चे मुख्यालय आहे !
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे कार्यालय
याच आश्रमात ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे कार्यालय आहे. येथील संपादक, वार्ताहर, दैनिकांच्या पानांची संगणकीय रचना करणारे, विज्ञापने आणणारे, मुद्रणालयात गठ्ठे बांधणारे किंवा जाहिराती आणि दैनिक यांच्या देयकांच्या वसुलीचे कार्य करणारे साधक राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी जागृती करण्यासाठी विनावेतन समर्पितभावाने सेवारत आहेत.
संकेतस्थळ (वेबसाईट) विभाग
माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेले, तसेच विविध महत्त्वाच्या पदांवरील मोठ्या वेतनाच्या नोकर्यांचा त्याग केलेले युवा साधक स्वयंस्फूर्तीने हिंदु धर्माचा प्रसार करणारी सनातनची संकेतस्थळे चालवत आहेत. त्यांनी धर्मावरील श्रद्धेपोटी ही संकेतस्थळे आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची बनवली आहेत.
ग्रंथनिर्मितीची सेवा
आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी आणि बंगाली या भाषांतील आवृत्त्यांची निर्मिती होते. विद्यार्थ्यांपासून ७० वर्षांपर्यंतच्या सर्व वयोगटांतील साधक टंकलेखन, संकलन, मुद्रितशोधन, संगणकीय रचना आदी सेवा येथे करतात.
कलेशी संबंधित सेवा
आश्रमात साधारणतः २० साधक कलेशी संबंधित सेवा करतात. ‘कलेसाठी कला’ नव्हे, तर ‘ईश्वराप्तीसाठी कला,’ हा दृष्टीकोन ठेवून ग्रंथांची मुखपृष्ठे, देवतांची सात्त्विक चित्रे आणि मूर्ती, सूक्ष्मज्ञानाशी संबंधित चित्रे, सात्त्विक रांगोळ्या, सात्त्विक मेंदी आणि सात्त्विक देवनागरी अक्षरे यांची निर्मिती करत आहेत.
सनातन पुरोहित पाठशाळा
या पाठशाळेत अध्ययन केलेले विद्यार्थी-पुरोहित सतत साधना म्हणून धर्मरक्षणासाठी धार्मिक विधी आणि यज्ञयाग करत आहेत. आश्रमात यज्ञशाळा असून येथे सतत धर्मरक्षणासाठी यज्ञयाग केले जातात. या ठिकाणी विद्यार्थी-पुरोहितांना ‘पौरोहित्यासाठीचे ज्ञान देण्याबरोबरच साधना म्हणून पौरोहित्य कसे करावे ?’, याचे शिक्षण दिले जाते.
सनातन कलामंदिर
या विभागात ध्वनीचित्रीकरण करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे २ ‘स्टुडिओ’, तर ध्वनीचित्र संकलन (व्हिडिओ एडिटिंग) करण्यासाठी १० कक्ष आहेत. ‘स्टुडिओ’मध्ये धार्मिक विधींचे आणि आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात येणार्या संशोधनाचे चित्रीकरण करण्यात येते.
आध्यात्मिक संग्रहालय
सूक्ष्म जगताची प्रचीती देणारे आणि आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतन करणारे हे जगातील एकमेव संग्रहालय आहे. योग वेदांत सेवा समितीचे सचिव श्री. मानव बुद्धदेव यांसारख्या मान्यवरांनी सनातनच्या आश्रमाला दिलेल्या भेटीत हे संग्रहालय पाहून म्हटले आहे की, ‘जर बुद्धीवाद्यांनी सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन बघितले, तर अध्यात्माविषयी त्यांच्यात जिज्ञासा निर्माण होऊ शकते आणि जे साधक आहेत, त्यांची श्रद्धा अन् साधनेतील तत्परता वाढू शकते.’
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. |