महाराष्ट्रातील सर्व ऑटोरिक्शा आणि टॅक्सी थांब्यांवर हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून द्यावा !

सुराज्य अभियानाच्या अंतर्गत परिवहनमंत्र्यांकडे मागणी !

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – येथील प्रादेशिक परिवहन (पूर्व) कार्यालयाने प्रवाशांशी गैरवर्तणूक करणार्‍या टॅक्सी आणि ऑटोरिक्शा चालकांवरील कारवाईची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली. यामध्ये तक्रार करण्यासाठी ९१५२२४०३०३ हा ‘व्हॉट्सअप’ क्रमांक, तसेच ‘[email protected]’ हा ई मेल आयडीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशा प्रकारे राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी तक्रार नोंदवण्यासाठी ‘व्हॉट्सअप’ क्रमांक आणि ‘ईमेल आयडी’ द्यावेत आणि ते प्रवाशांना कळावेत, यासाठी राज्यातील सर्व टॅक्सी आणि ऑटोरिक्शा थांब्यांवर त्याचा फलक लावण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आली आहे.

१. मुंबईमध्ये दादर, वडाळा आदी रेल्वेस्थानकांच्या बाहेर जवळच्या ठिकाणी घेऊन जाण्यास टॅक्सीचालक अनेकदा नकार देतात. मुंबई आणि उपनगरांतील अनेक टॅक्सी अन् ऑटोरिक्शा स्थानकांवरही असे प्रकार होत आहेत.

२. ठाणे रेल्वेस्थानकाच्या बाहेरही ऑक्टोरिक्शा चालकांच्या संदर्भातही असा अनुभव येतो. राज्यात सर्वत्रच अल्प-अधिक प्रमाणात असे प्रकार चालू आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

३. एखाद्या ऑक्टोरिक्शा किंवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास समजू शकतो; मात्र काही स्थानकांवर अनेक टॅक्सी किंवा ऑक्टोरिक्शा चालक विनवणी करूनही जवळच्या ठिकाणी जाण्यास स्पष्ट नकार देतात. त्यांना नियम सांगितल्यास त्यालाही ते जुमानत नाहीत.

४. भर दुपारी किंवा रात्री-अपरात्री रिक्शा अथवा टॅक्सी चालकांनी घेऊन जाण्यास नकार दिला, तर अशा वेळी प्रवाशांपुढे वाहनाची मोठी समस्या निर्माण होते. त्यात महिला किंवा वृद्ध प्रवासी असल्यास त्यांना याचा अधिकच त्रास होतो. यामुळे अनेकदा प्रवासी आणि टॅक्सी अन् ऑटोरिक्शा चालक यांच्यात वादही होतो.

५. हे प्रकार रोखण्यासाठी आणि यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन पत्राद्वारे सुराज्य अभियानाकडून करण्यात आले आहे. या पत्रामध्ये काही उपाययोजनाही सुराज्य अभियानाकडून सुचवण्यात आल्या आहेत.