संतप्त चीनने श्रीलंकेला देण्यात येणारे साहाय्य थांबवले !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेने ३ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम चिनी आस्थापनांना दिले होते; मात्र चीनशी असलेला करार रहित करून श्रीलंकेने भारताशी करार केला आहे. या प्रकल्पाची क्षमता २ सहस्र २३० किलोवॅट अशी आहे. त्यासाठी भारत सरकार कर्जाऐवजी श्रीलंकेस १ कोटी १० लाख डॉलर (सुमारे ९० कोटी रुपये) अनुदान म्हणून देईल. हे भारताच्या कूटनीतीला मिळालेले यश मानले जात आहे.
श्रीलंकेने नैनातिवू, डेल्फ्ट (नेदुनथीवू) आणि अनालाईतिवू बेटांवर ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांसाठी चीनशी करार केला होता. श्रीलंकेने हा करार रहित केला आहे. यामुळे चीन संतापला असून त्याने श्रीलंकेतील नागरिकांना दिले जाणारे साहाय्य थांबवण्याची सिद्धता चालू केली आहे. तसेच तो श्रीलंकेवर दबाव वाढवण्यासाठीही प्रयत्न करत आहे. चीनने श्रीलंकेत ‘चायना फाऊंडेशन फॉर रूरल डेव्हलपमेंट’कडून चालवण्यात येणार्या ‘स्मायलिंग चिल्ड्रन फूड पॅकेज’ प्रकल्पातील साहाय्य घटवण्यात आले. यात प्रतिदिन १४२ शाळांमधील १० सहस्र विद्यार्थ्यांना शिधा पोचवला जात होता. ही सुविधा लवकरच बंद केली जाईल, असे अधिकारी सांगतात.
संपादकीय भूमिकाश्रीलंकेला चीनचा धोका लक्षात आल्याने तो आता चीनचे जोखड फेकून देऊन त्याचा खरा मित्र असणार्या भारताच्या पुन्हा जवळ येत आहे. श्रीलंकेप्रमाणेच मालदीवलाही त्याची चूक लवकरच लक्षात येईल, अशी अपेक्षा ! |