मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रचला नवीन विक्रम !

गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सलग ५ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेले पहिले मुख्यमंत्री !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २० मार्च (वार्ता.) : गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वाधिक काळ म्हणजे सलग ५ वर्षे मुख्यमंत्रीपदी रहाणारे डॉ. प्रमोद सावंत हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर म्हणजे १९ मार्च २०१९ या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर वर्ष २०२२ मधील विधनासभा निवडणुकीपर्यंत डॉ. सावंत हे मुख्यमंत्रीपदी होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांना हंगामी मुख्यमंत्रीपदाचे दायित्व देण्यात आले. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली. १९ मार्च २०२४ या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने ५ वर्षे पूर्ण केली आहेत. डॉ. प्रमोद सावंत हे सलगपणे ५ वर्षे मुख्यमंत्रीपदी रहाणारे राज्याचे चौथे नेते ठरले आहेत.

यापूर्वी स्व. भाऊसाहेब बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर आणि प्रतापसिंह राणे हे सलग ५ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत हे वर्ष २००७ ते २०१२ या कालावधीत ४ वर्षे २७४ दिवस मुख्यमंत्रीपदी होते. देशभरात भाजपशासित राज्यांमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार्‍या सूचीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे चौथ्या स्थानावर आहेत. यापूर्वी अरुणाचल प्रदेशचे पेमा खंडू, मणीपूरचे एन्. बिरेन सिंग आणि उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी ५ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर काही दिवसांत गोव्यासह जगभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला. त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही राज्याची आर्थिक स्थिती विस्कटू न देता राज्यातील विकासकामे आणि सामाजिक योजना चालू ठेवल्या. यानंतर त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या मोहिमेला प्रारंभ केला. या मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.