पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ३ आगीच्या घटना !

‘बेलाकासा’ इमारत येथे असलेल्या कामगारांच्या वसाहतीमध्ये आग

पुणे – सुसगाव येथील ‘बेलाकासा’ इमारत येथे असलेल्या कामगारांच्या वसाहतीमध्ये ३ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झोपड्यांना आग लागली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून संसारापयोगी साहित्य जळून खाक झाले. त्याठिकाणी असलेले लहान-मोठे २८ सिलिंडर मात्र जळून गेले.

आग लागल्याचे समजताच अग्नीशमनदलाकडून वारजे, औंध, पाषाण, कोथरूड येथील अग्निशमन वाहने बोलवण्यात आली. आग इतर झोपड्यांना लागू नये याची विशेष काळजी घेण्यात आली. कामगारांच्या ५० झोपड्या असून त्यातील २० झोपड्या जळाल्या. इतर ३० झोपड्यांना अग्नीशमनदलाच्या जवानांनी सुरक्षित ठेवले.

येरवडा येथील कारखान्यास आग

‘साऊंड बॉक्स’ सिद्ध करण्याच्या कारखान्यास आग

येरवडा (पुणे) येथे विडी कामगार वसाहतीमधील पत्राशेडमध्ये संगीताचे ‘साऊंड बॉक्स’ सिद्ध करण्याच्या कारखान्यास आग लागली. कारखान्यांमध्ये लाकडी साहित्य असल्याने आगीने त्वरित रौद्र रूप धारण केले. कोणतीही जीवित हानी झाली नसून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणांवर नुकसान झाले.

बिबवेवाडी येथील ‘गॅरेज’ला आग

‘मतीन कार केअर्स गॅरेज’ला आग

बिबवेवाडी येथील ‘आई माता मंदिरा’जवळील ‘मतीन कार केअर्स गॅरेज’ला (चारचाकी गाड्या दुरुस्ती करण्याचे ठिकाण) आग लागली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या बी.एम्.डब्ल्यू., मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, ह्युंदाई, फोर्ड या आस्थापनांच्या एकूण १७ चारचाकी गाड्या जळाल्या. अग्नीशमनदलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

आळंदी येथील ‘सिद्धबेट’ येथे आग

‘सिद्धबेट’ परिसरातील बांबूच्या झाडांना आग

आळंदी येथील ‘सिद्धबेट’ परिसरातील बांबूच्या झाडांना समाजकंटकांकडून आग लावण्यात आली. आग लागल्यानंतर धूर निघालेले दिसल्यानंतर अग्नीशमनदलास कळवण्यात आले. आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांबूंचे वृक्ष जळाले आहेत.