तमिळनाडूतील राजकारण, चित्रपट आणि अमली पदार्थांची तस्करी !

१. भारताला अमली पदार्थांच्या तस्करीचा विळखा 

अमली पदार्थ

विविध प्रकारच्या अमली पदार्थांच्या (नॉर्काेटिक्स) तस्करीची समस्या भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात आहे. ही तस्करी थांबवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात घेतल्याची वृत्ते येत असतात, तसेच तस्करांनाही अटक केली जाते. मध्यंतरी महाराष्ट्रातही अनेक तरुण कारखानदारीच्या नावाखाली मादक द्रव्ये आणि अमली पदार्थ यांची निर्मिती करण्यात पुढे होते. अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अलीकडेच ललित पाटील याला अटक झाली. त्याला कारागृहात असतांना मिळणार्‍या सुविधांविषयी काही पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. अमली पदार्थांच्या व्यापाराचा संबंध राजकारण, चित्रपट, ‘रिअल इस्टेट’ (स्थावर मालमत्ता), उपाहारगृह यांच्याशी जोडला जातो; पण या समस्येचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

२. भारतीय चित्रपटसृष्टीचा अमली पदार्थांशी संबंध 

देशात चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींचा अमली पदार्थांशी जवळचा संबंध आहे. अशाच प्रकरणात काही वर्षांपूर्वी अभिनेते सुशांतसिंह राजपूत आणि त्यांच्या स्वीय सचिव यांना प्राण गमवावे लागले. अमली पदार्थांचे सेवन करणे आणि ते जवळ बाळगणे या प्रकरणी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा पकडला गेला होता; परंतु तो प्रचंड पैशांच्या बळावर सुटला. सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप राजकीय नेत्यावर सातत्याने होत असतो. दुर्दैवाने अमली पदार्थांच्या प्रकरणात अशा लोकांची नावे आल्यानंतर अन्वेषण यंत्रणा हतबल ठरतात.

३. तमिळनाडूमध्ये सहस्रो कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी द्रमुक कार्यकर्ता जफर सादिकला अटक

(द्रमुक – द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे द्रविड प्रगती संघ)

जफर सादिक

तमिळनाडूत सहस्रो कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा व्यापार करणारा जफर सादिक पकडला गेल्याचे वृत्त नुकतेच आले होते. तो द्रमुकचा कार्यकर्ता आहे. त्याने भारतासह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये ४ सहस्र कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ‘सुडोअफ्रेड्रील’ हा अमली पदार्थ कह्यात घेण्यात आला.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिनचा पुत्र उदयनिधी स्टॅलिन हा मंत्री आहे. त्याचे अमली पदार्थ तस्करांशी जवळचे संबंध असल्याचे अन्वेषण यंत्रणेला समजले. जफर सादिक याने उदयनिधी स्टॅलिनला ७ लाख रुपये दिल्याचे अन्वेषणात सांगितले. याचा अर्थ अमली पदार्थांचा व्यापार करणारे त्यांच्या उत्पन्नातील काही हिस्सा राजकारण्यांना देतात. हा पैसा चित्रपटसृष्टी, ‘रिअल इस्टेट’, उपाहारगृहे यांमध्ये फिरत असतो. जफर सादिक हा धर्मांध स्वतः तमिळ चित्रपटांचा निर्माता आहे. त्यामुळे त्याचे चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींशी संबंध आहेत.

४. स्टॅलिन पिता-पुत्रांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाला आमंत्रण

या प्रकरणात ‘नार्काेटिक कंट्रोल ब्युरो’च्या (अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या) अधिकार्‍यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (‘ईडी’ला) अन्वेषण करण्यास सांगितले आहे. जफर सादिक याच्या चौकशीसह त्याला पोसणारे उदयनिधी स्टॅलिन आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांचीही चौकशी करण्यास सांगितले. ही चौकशी चालू आहे, तोपर्यंत मंत्री उदयनिधी स्टॅलिन याला मंत्रीपदावरून निलंबित करावे. या प्रकरणात मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा सहभाग आढळल्यास राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लावणे योग्य ठरेल. अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्या प्रकरणाप्रमाणे नवनवीन प्रकरणे समोर येतात आणि मागील प्रकरणांचा विसर पडतो. त्यामुळे असे अपप्रकार सातत्याने घडतात.

५. दक्षिणेतील हिंदूंनी जागृत आणि संघटित होणे आवश्यक !

स्टॅलिन कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी सत्ता टिकवण्यासाठी सकाळ-संध्याकाळ सनातन हिंदु धर्मावर टीका करतात. गेली अनेक दशके कथित आर्य-द्रविड वाद असल्याचे भासवून जनतेला मूर्ख बनवतात. ‘आर्य बाहेरून आले आहेत’, असे म्हणणारे हे लोक धर्मांध आणि ख्रिस्ती यांची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे सर्व ठाऊक असतांनाही द्रविडियन मंडळी त्यांना पायघड्या घालतात.

दक्षिणेतील हिंदु मतदार जागृत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षे द्रविडीयन पक्षाच्या साहाय्याविना राष्ट्रीय पक्षांना सत्ता मिळवता येत नाही. मग राजकीय पक्षांना ‘द्रमुक’, ‘अण्णाद्रमुक’ किंवा ‘एम्.डी.एम्.के.’ अशा स्थानिक पक्षांचे साहाय्य घ्यावे लागते. ही स्थिती पालटण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्ये जागृती आणि संघटन होणे आवश्यक आहे.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (९.३.२०२४)