संगणकीय प्रणालीद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पहातांना पटना (बिहार) येथील सौ. महिमा दराद यांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रांची येथील एका साधिकेच्या घरी जाऊन संगणकीय प्रणालीद्वारे ब्रह्मोत्सव पहाण्याची संधी मिळणे

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी कार्यक्रम पहाण्यासाठी अडथळे येत होते. कार्यक्रम पहाण्याची सोय होत नव्हती. अडथळे दूर होण्यासाठी मी श्री गुरुचरणी पुनःपुन्हा प्रार्थना करत होते. गुरुदेवांनी कृपा केली आणि माझ्या यजमानांना अकस्मात् त्यांच्या नोकरीनिमित्त झारखंड राज्याची राजधानी रांची येथे जावे लागले. त्या वेळी त्यांच्या समवेत आम्हीही (मी आणि माझ्या दोन्ही मुली) गेलो. रांचीमध्ये जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहाण्यासाठी तेथील स्थानिक साधिकेच्या घरी जाण्याचा विचार गुरुदेवांनीच मला सुचवला. मला रांचीमधील एका साधिकेच्या घरी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा जन्मोत्सव, म्हणजे ‘ब्रह्मोत्सव’ पहाण्याची संधी मिळाली.

२. संगणकीय प्रणालीद्वारे ‘ब्रह्मोत्सव’ पहातांना आलेल्या अनुभूती

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी अर्पण केलेल्या पुष्पांप्रमाणे स्वतःही त्यांच्या चरणी समर्पित झाले असल्याचे जाणवणे : ‘ब्रह्मोत्सवा’ला आरंभ होताच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना पुष्पे अर्पित करत होत्या. त्या वेळी मी ‘त्या पुष्पांची कोमलता अधिक असून ती गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श करत आहेत’, असे अनुभवत होते. त्या वेळी माझ्याकडून गुरुदेवांना सतत प्रार्थना होत होती. ‘हे गुरुदेवा, माझे सर्व स्वभावदोष आणि अहं नष्ट करून मलाही शुद्ध, कोमल आणि निरपेक्ष प्रेम आपण प्रदान करावे.’  त्यानंतर ‘मी साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी समर्पित झाले आहे’, असे मला वाटले.

२ आ. डोळे बंद केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि त्यांच्या समवेत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ रथात विराजमान झाल्याचे दृश्य दिसणे आणि प्रत्यक्षातही साधिकेला तसेच दिसणे : गुरुदेवांच्या रथाविषयी उद्घोषणा झाली. तेव्हा मी माझे डोळे बंद केले. तेव्हा मला डोळ्यांसमोर एक पडदा लावलेला दिसला. ‘त्या पडद्यामागे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव रथावर विराजमान आहेत आणि त्यांच्या समवेत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ आहेत’, असे दृश्य दिसले. थोड्या वेळानंतर मी डोळे उघडून पाहिल्यावर खरोखरच समोर एक पडदा लावलेला होता. तो पडदा बाजूला झाल्यानंतर समोर रथात विराजमान सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि सद्गुरुद्वयी बसलेल्या दिसत होत्या.

२ इ. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवात प्रत्येक क्षणी मी डोळे बंद करूनही केवळ अलौकिक आनंदच अनुभवत होते. त्यामुळे मला वारंवार भावाश्रू येत होते.

२ ई. मला आध्यात्मिक लाभ होऊन चैतन्य मिळत होते.

२ उ. रथ साधकांनी बनवला असल्याने त्यांच्यामुळेच तिन्ही गुरूंचे दर्शन घडल्याने साधकांप्रती कृतज्ञता वाटणे : ‘गुरुदेव विराजमान झालेला रथ साधकांनी बनवला आहे’, असे मला समजले. त्यांच्या कृपेमुळेच आमच्या प्राणप्रिय सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना सद्गुरुद्वयींसह रथात विराजमान झालेले पहाण्याची संधी मला मिळाली. तेव्हा त्या साधकांप्रती माझ्या मनात कोटीशः कृतज्ञता व्यक्त होत होती.

२ ऊ. रथ अतिशय भव्य वाटत होता. ‘रथावरचे नक्षीकाम एखाद्या उच्च कोटीच्या देवतांनी केले आहे आणि तो रथ म्हणजे देवलोकातून आलेले पुष्पक विमानच आहे’, असे मला वाटले.

२ ए. बाहेर ऊन असूनही संपूर्ण कार्यक्रमात अत्यंत शीतलता आणि वायुमंडलात चैतन्य अनुभवायला मिळाले.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी हा दिव्य अनुभव घेऊ शकले. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ.  महिमा दराद, पटना, बिहार. (३०.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक