सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित “महाराष्ट्र मंदिर महासंघाचे” पदाधिकारी आणि कार्यकर्ते

सातारा, १२ मार्च (वार्ता.) – घाटवण येथील श्री घाटाईदेवी आणि गोडोली येथील श्रीसाईबाबा मंदिरातील चोरीचे अन्वेषण पोलिसांनी प्राधान्याने करावे. चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पदाधिकारी आणि २५ हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिसांना निवेदन देतांना ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पदाधिकारी

निवेदनामध्ये म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील कास पठाराजवळ असणार्‍या घाटवण येथील श्री घाटाईदेवी मंदिरात ५ मार्चच्या पहाटे चोरी झाली. यामध्ये २ महिला आणि १ पुरुष यांचा समावेश आहे. चोरीमध्ये उपयोगात आणलेली दुचाकीही चोरीचीच आहे, अशी माहिती मिळते. चोरांनी श्री घाटाईदेवी मंदिरातील पितळी घंटा, एक समई, देवीचा मुखवटा आणि वाघाची मूर्ती, स्टीलची ताटे, एल्.ई.डी. हॅलोजन, तसेच दानपेटीतील रोख रक्कम अनुमाने १७ सहस्र रुपये चोरी झाले आहेत. सर्व मुद्देमाल धरून अंदाजे २० सहस्र ४०० रुपयांची चोरी झाली आहे. याविषयी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दुसर्‍या घटनेमध्ये सातारा शहरातील गोडोली येथील प्रसिद्ध श्रीसाईबाबा मंदिरात ४ ऑक्टोबर २०२३ च्या रात्री ५ कुलुपे तोडून चोरी झाली. यामध्ये अंदाजे १६ ते २० किलो चांदीच्या वस्तू आणि तांब्याची भांडी चोरीला गेली आहेत. याचीही तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे; मात्र अद्याप कोणत्याही अन्वेषणाला गती मिळालेली नाही. घाटवण येथील श्री घाटाईदेवी मंदिरात आणि गोडोली येथील श्रीसाईबाबा मंदिरात चोरी करणार्‍या व्यक्तींना तातडीने अटक करण्यात यावी. त्यांच्यावर कठोरातील कठोर कलमे लावून गुन्हे नोंद करण्यात यावेत, तसेच हा खटला द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावा.