Fake Temple Priest Fight : एका मंदिरात देणगीच्या वाटपावरून पुजार्‍यांमध्ये मारामारी झाल्याचा व्हिडिओ निराधार !

मनीष कुमार या ‘एक्स’ वापरकर्त्याने प्रसारित केला होता बनावट व्हिडिओ !

नवी देहली – अधिवक्ता मनीष कुमार नावाच्या ‘एक्स’ वापरकर्त्याने नुकताच एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये मंदिराला मिळालेल्या देणगीवरून तेथील पुजार्‍यांमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात हा व्हिडिओ निराधार असून मूळ घटना ही जानेवारी २०२४ मधील तमिळनाडूच्या कांचीपूरम् येथील वरदराजा पेरुमल मंदिराच्या संदर्भातील आहे. यांतर्गत मिरवणुकीच्या वेळी देवतेची मूर्ती मंदिरातून मिरवणुकीत आणली जात असतांना अय्यंगारांचे दोन पंथ वडकलाई आणि थेंकलाई यांच्यात भांडण झाले. यातून मनीश कुमार यांच्या व्हिडिओतील खोटेपणा उघड झाला. या व्हिडिओतील बनावट प्रकार दैनिक ‘लोकसत्ता’ने उघड केला.

‘सनातन प्रभात’ने मनीष कुमार यांचे ‘एक्स’ खाते पाहिल्यावर लक्षात आले की, त्यावर अनेक हिंदुविरोधी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले असून हिंदूंना लक्ष्य केले गेले आहे. यातून मनीष कुमार हे कट्टर हिंदुद्वेष्टे असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे संबंधित व्हिडिओला विरोध झाल्यावर मनीष कुमार यांनी तो व्हिडिओ ‘डिलीट’ करून टाकला.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या विरोधात ऊठसूठ निराधार आरोप करून हिंदुद्वेषी वातावरण निर्माण करणार्‍यांवर केंद्र सरकारने कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. यातूनच हिंदूंच्या विरोधात कुणी काही बोलू धजावणार नाही !