कोल्हापूर अन्नधान्य वितरण अधिकारी श्रेणी- २ कार्यालयातील प्रकार !
सांगली, १० मार्च (वार्ता.) – येथील अन्नधान्य वितरण अधिकारी श्रेणी-२ कार्यालयात ‘आधार’ची माहिती भरण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून पैशांची मागणी करणार्या ‘ऑपरेटर’वर कठोर कारवाई करावी. याविषयी प्रशासनाने संबंधित कार्यालयातील कामकाजात सुधारणा न केल्यास, ठाकरे गटाच्या वतीने अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, तसेच वेळप्रसंगी उपोषण करण्यात येईल’, अशी चेतावणी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, शहरप्रमुख विराज बुटले, विभाग प्रमुख शीतल थोरवे, उपविभागप्रमुख अल्ताफ नदाफ यांसह ठाकरे गटाने दिली आहे.
शंभुराज काटकर म्हणाले की,…
१. १६ फेब्रुवारी या दिवशी येथील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या कार्यालयातील अनागोंदी कारभार आणि लोकांची होणारी लूट यांविषयीचे ठाकरे गटाने निवेदन दिले होते.
२. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कार्यालयीन कामकाजात फेरपालट किंवा सुधारणा झालेली नाही. सातत्याने ग्राहकांना ‘ऑनलाईन’च्या नावाखाली कार्यालयातून परत पाठवले जात आहे.
३. जे कार्यालयीन आवेदन ‘ऑनलाईन’ पद्धतीने येतात, त्यांनीच येथे शिधापत्रिका कामासाठी यावे, ‘ऑफलाईन’ काम स्वीकारले जाणार नाही’, असे सांगितले जात आहे.
४. २० डिसेंबर २०२३ या दिवशी झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे ‘ऑनलाईन’ सेवेवरच आम्ही कार्य करतो, हे प्रशासन सांगत आहे; मात्र या अध्यादेशामध्ये असा कोणताही उल्लेख नाही.
५. सेतू केंद्र सेवाकेंद्र आणि ‘सर्व्हिस सेंटर’ची असलेल्या लागेबांध्याचा अपलाभ घेऊन प्रशासन लोकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड लावत आहे.
६. त्याचसमवेत कार्यालयात नेमलेल्या साहाय्यकांकडून (उमेदवार) आधारकार्ड घेऊन येणार्या अशिक्षित लोकांना शासनाने विनामूल्य सुविधा दिल्या असतांना लोकांकडून २०० ते ४०० रुपये उकळण्याचा उद्योग येथील काही महिला प्रशिक्षित कर्मचारी यांनी चालवलेला आहे.
७. याची माहिती पुराव्यासह प्रशासनाला दिल्यानंतरही संबंधितांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. (या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करणार, हे स्पष्ट केले पाहिजे. – संपादक)