Islam Sinicisation : शिनजियांगमध्ये आतंकवाद अजूनही अस्तित्वात असल्याने इस्लामचे चिनीकरण अपरिहार्य आहे ! – चीन

शिनजियांग प्रांताचे नेते मा झिंगरुई

बीजिंग (चीन) – चीनच्या शिनजियांगमध्ये इस्लामचे चिनीकरण अपरिहार्य आहे, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. शिनजियांगमध्ये कट्टरतावाद आणि आतंकवाद अजूनही अस्तित्वात आहे. इस्लामचे चिनीकरण होणे फार महत्त्वाचे आहे आणि ते होईल, असे विधान ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या शिनजियांग प्रांताचे नेते मा झिंगरुई यांनी पत्रकार परिषदेत केले.

१. चीन दीर्घकाळापासून शिनजियांग प्रांतामध्ये रहणार्‍या मुसलमानांवर दडपशाही करत आहे. इस्लामचे चीनीकरण म्हणजे ‘चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या हितसंबंधांवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने इस्लाम किंवा इतर कोणत्याही धर्माची रचना करणे.’ कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे आहे की, लोकांनी पक्षाला धर्माच्या वर ठेवावे.

२. चीन शिनजियांग प्रांतात अनेक वर्षांपासून मुसलमानांवर अत्याचार करत आहे. येथे अनुमाने १६ सहस्र मशिदी पाडण्यात आल्या आहेत किंवा त्यांत पालट करण्यात आला आहे. येथे मुसलमानांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा पाळण्याचीही अनुमती नाही. त्यांना त्यांच्या धार्मिक मान्यतेविरुद्ध डुकराचे मांस दिले जाते. हे सर्व सरकारी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली घडत आहे.

३. चीनने शिनजियांग राज्यात १० लाखांहून अधिक मुसलमानांना कारागृहात डांबल्याचा आरोप आहे. या मुसलमानांचा पेहराव आणि जीवनशैली पालटण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना रमझान महिन्यात उपवास करण्याचीही अनुमती नाही.

संपादकीय भूमिका

चीन हे उघडपणे असे सांगत असतांनाही जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडत नाही; मात्र भारतात मुसलमानांवर कोणताही अत्याचार होत नसतांना उलट त्यांच्याकडून हिंदूंवर अत्याचार होत असतांना हेच इस्लामी देश अन् त्यांची संघटना भारतावर आरोप करत असते !