रत्नागिरी – महिला शक्ती जागृत करण्यासाठी महिलादिन आहे, असे मला वाटते. त्यामुळे सर्व महिलांनी सुप्त शक्ती जागृत करूया. देवाने एकतरी छंद दिलेला असतो, तो शोधा. स्वत:चे आत्मबळ वाढवा, त्यातून आनंद मिळतो. सुखाच्या मागे लागू नका; कारण सुखामागून दुःख वाट्याला येणार; म्हणून आत्मिक समाधानाकरता प्रयत्न करा. महिलांकडे युक्ती असते, त्यासमवेत शक्ती आणि भक्तीसुद्धा करा. कष्ट करा, व्यायाम करा, स्वत:वर प्रेम करा, असे आवाहन डॉ. निशीगंधा पोंक्षे यांनी केले.
‘सीए इन्स्टिट्यूट’च्या रत्नागिरी शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मथुरा हॉटेलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी डॉ. पोंक्षे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. याप्रसंगी डॉ. पोंक्षे यांची प्रकट मुलाखत सौ. दीप्ती पंडित यांनी घेतली. सूत्रसंचालन सीए मोनाली कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमाला शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांच्यासह उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सीएच्या फर्ममधील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच ज्येष्ठ सीए उपस्थित होते. याप्रसंगी सीए अभिलाषा मुळ्ये यांनी सीए इन्स्टिट्यूटबद्दल माहिती दिली. माझ्या कार्यकाळात महिलादिनाचा हा पहिला कार्यक्रम असून यापुढे विविध उपयुक्त चर्चासत्रे, परिसंवाद कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. रत्नागिरी शाखेच्या वतीनेआयोजित कार्यक्रमांमध्ये महिला कर्मचार्यांनीही भाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
डॉ. पोंक्षे यांनी शिक्षण घेणारी मुलगी, विवाह ते चाळीशीपर्यंत आणि त्यापुढील वयोगटातील ज्येष्ठ महिला अशा वयोगटातील महिलांकरता मार्गदर्शन केले. पाली येथील बचत गटांच्या महिलांना विमान प्रवास, हॉटेल व्यवसाय यांविषयी त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, मानसिक आणि शारीरिक दृष्टीने तुम्ही बलवान व्हा. एखाद्या कामाचे दायित्व तोच घेतो, जो दोन्ही दृष्टीने बलवान आहे. या कामासाठी परमेश्वर तथास्तु म्हणत असतो. आपण निष्काम भावनेने काम केले की, आपले आत्मबळही वाढते. माझे शिक्षण पुण्यात झाले. वर्ष १९८८ मध्ये विवाहानंतर रत्नागिरीत आले. पाली येथे सासरे आणि पतीची वैद्यकीय सेवा असल्याने त्याचा लाभ स्त्री रोगतज्ञ म्हणून काम करतांना झाला. सासुबाईंनी खूप सांभाळून घेतले. मुलांच्या निमित्ताने मीही पोहायला शिकले आणि पोहण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवले. सध्या आध्यात्मिक क्षेत्रात काम करतआहे.