कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण सुनावणी
कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित वासुदेव सूर्यवंशी यांच्यासंदर्भात बेळगाव येथे घडलेल्या प्रसंगांविषयीची पंच कर साहाय्यक यल्लोसा पवार यांची साक्ष ६ मार्चला नोंदवण्यात आली. यात पंचनामा करतांना त्यातील दिनांकामध्ये खाडाखोड आहे. जिथे खाडाखोड झाली तिथे पंचांची स्वाक्षरी नसून केवळ साहाय्यक पोलीस निरीक्षकांची स्वाक्षरी आहे. पहिल्या पानावर असलेली स्वाक्षरी आणि शेवटच्या पानावर असलेली साहाय्यक पोलीस निरीक्षकांची स्वाक्षरी यांत तफावत आहे. यांसह पंचांनी प्रत्यक्ष न्यायालयात दिलेला जबाब आणि प्रत्यक्ष नोंदवण्यात आलेला पंचनामा यांत अनेक तफावती आहेत, असे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. सरकारपक्षाच्या वतीने अधिवक्ता हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे उपस्थित होते.
पंचनाम्यात अनेक नावे अपूर्ण आणि अर्धवट आहेत. पहिल्या पंचनाम्यात पंचांच्या नावाचा उल्लेख नाही. पंचनाम्यासाठी पोलिसांनी कोणती साधनसामुग्री घेतली ते पंचनाम्यात नमूद नाही यांसह अनेक गोष्टी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
हा पंचनामा तीन टप्प्यांत झालेला असतांना प्रत्येक टप्प्याची वेळ नमूद नाही. पंचांनी चारचाकी वाहनाने कोल्हापूर-बेळगाव असा प्रवास केला. या प्रवासात २ पथकर नाके लागतात. या प्रवासाच्या कालावधीत त्यांनी पथकर भरल्याच्या नोंदी पंचनाम्यात नाहीत. गाडीचा प्रवास किती किलोमीटर झाला ? याची नोंद नाही, असे उलट तपासणीत अधिवक्ता अनिल रुईकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अधिवक्ता डी.एम्. लटके यांनीही पंचांची उलट तपासणी घेतली. या प्रसंगी अधिवक्त्या प्रीती पाटील उपस्थित होत्या. पुढील सुनावणी २६ मार्चला होणार आहे.