लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आंतरराज्य-आंतरजिल्हा सीमेवरील जिल्हा प्रशासनाची समन्वय बैठक !
कोल्हापूर – येत्या २ महिन्यांत होणार्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगाव प्रशासनाने आंतरराज्य अन् आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय समन्वयक बैठकीत घेतला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील आणि लगतच्या इतर जिल्ह्यांतील अधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘‘निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. कायमस्वरूपी ‘चेक पोस्ट’ समवेतच सीमेवर तात्पुरत्या ‘चेक पोस्ट’ची स्थापना करणे आवश्यक आहे. निवडणुकीवर परिणाम होऊ शकणार्या चलन, मद्य आणि इतर वस्तू यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी दक्षता भक्कम करण्याची आवश्यकता आहे.’’
निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणार्या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणार्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करणे, ग्रामीण भागात धावणार्या वाहनांची प्रत्येक ठिकाणी कसून पडताळणी करणे, निवडणूक काळात चलन, मद्य आणि इतर वस्तू यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी सीमा भागातील क्षेत्रीय अधिकारी यांनी समन्वय ठेवून करणे असे विविध निर्णय घेण्यात आले.