मुंबई – मीटरपेक्षा अधिक भाडे आकारणार्या ५४ आणि योग्य कारणाविना भाडे नाकारणार्या ५५७ ऑटो रिक्शा अन् टॅक्सी चालक यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. जुलै २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. वरील तक्रारींसह प्रवाशांसमवेत गैरवर्तन करणे आदी सर्व मिळून प्राप्त झालेल्या १ सहस्र ८६५ जणांविरोधातील तक्रारींवरून ७३९ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
तक्रारदारांपैकी ९६ चालकांनी तडजोड करून २ लाख ३७ रुपये इतका दंड जमा केला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून तक्रारदारांना कारवाईची माहिती देण्यात आली आहे. यांमध्ये काही प्रवाशांनी चुकीची तक्रार केली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. अशा प्रवाशांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून अवगत करण्यात आले आहे.
टॅक्सी आणि ऑटो रिक्शाचालक यांविरोधात अशी तक्रार करता येईल !
प्रवाशांसमवेत गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा अधिक भाडे घेणे यांविषयी टॅक्सी अन् ऑटो रिक्शा चालक यांच्या विरोधात ९१५२२४०३०३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर प्रवाशांना तक्रार करता येईल. यासह ‘[email protected]’ या प्रादेशिक परिवहन विभागाच्या ईमेल आयडीवर तक्रार करता येणार आहे.