फोंडा, गोवा येथील श्री. प्रभाकर गणपतराव बिच्चू (वय ८० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांची त्यांच्या पत्नी सौ. वनिता बिच्चू यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. प्रभाकर बिच्चू

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. इतरांचा विचार करणे

सौ. वनिता बिच्चू

१ अ १. पत्नीला आश्रमात सेवेला जाण्यासाठी साहाय्य करणे : ‘मी सेवेसाठी सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) येथे जाते. माझे यजमान श्री. प्रभाकर बिच्चू यांना ‘मी आश्रमात वेळेवर जावे’, असे वाटते. ते मला म्हणतात, ‘‘सेवा अधिक असल्यास घरी येण्याची घाई करू नकोस. सेवा पूर्ण करूनच घरी ये.’’ ते घरी एकटेच असतात. मला उशीर झाला, तरी ते चिडचिड करत नाहीत. त्यांना ऐकू येत नाही; परंतु मलाही त्यांची काळजी वाटत नाही. मी घरातून आश्रमात जातांना वास्तुदेवता आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांना ‘मी आश्रमात जात आहे’, अशी प्रार्थना करते. त्यामुळे मला आणि त्यांनाही काळजी वाटत नाही. त्यांची आणि माझी गुरुदेवांवर अतूट श्रद्धा असल्यामुळे हे शक्य झाले आहे. गुरुदेवा, ही तुम्ही आमच्यावर केलेली पुष्कळ मोठी कृपा आहे.

१ अ २. ‘पत्नीला वेळेत सेवेला जाता यावे’, यासाठी जेवणाच्या वेळेतील पालट त्वरित स्वीकारणे : गुरुदेवा, मी केवळ ६ घंटेच आश्रमात जाते. पूर्वी मी सकाळी १०.३० वाजता जात असे. आता मला शक्य होत नाही. श्री. बिच्चू यांना दुपारी १.३० वाजता जेवायची सवय होती; पण मी सेवेच्या वेळेसंदर्भात सांगितल्यावर त्यांनी लगेच त्यासंदर्भातील पालट स्वीकारला आणि स्वतःची जेवणाची वेळ १२.३० वाजता ठरवली. मी एकदाच त्यांना म्हणाले, ‘‘आपल्याला घराचा आश्रम करायचा आहे.’’ ते त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात.

१ अ ३. घरकामात साहाय्य करणे : त्यांचा मला घरकामात साहाय्य करण्याचा भाग वाढला आहे. मला ८ दिवस कमरेत लचक भरल्याने, तसेच सांधेदुखीमुळे काम करतांना त्रास होत होता. हे त्यांना समजल्यावर ते प्रतिदिन भांडी घासण्याची सेवा करू लागले.

१ आ. सहनशीलता : ते नियमित व्यायाम करतात. एकदा ते चालतांना पडले आणि ढोपर फुटले; पण त्यांनी मला सांगितले नाही. त्यांची सहनशीलता दांडगी आहे. दुसर्‍या दिवशी मला शेजारच्या मुलाने याविषयी सांगितले. (मी त्यांच्या ढोपराला गोमूत्र, कापूर आणि हळद यांचे मिश्रण करून लावले.) त्यांना मधुमेहाचा त्रास आहे; पण गुरुदेवांच्या कृपेने ३-४ दिवसांत त्यांची जखम बरी झाली.

१ इ. आमचे लग्न झाले, तेव्हा ते रागीट होते; पण आता ते पुष्कळ शांत आणि संयमी झाले आहेत.

१ ई. प्रार्थना आणि समष्टी नामजप तळमळीने पूर्ण करणे : त्यांना समष्टीसाठी नामजप करायला सांगितला आहे. आजपर्यंत त्यांनी त्यासाठी कधीच ‘नाही’ म्हटले नाही. ते प्रत्येक वेळी सकारात्मक राहून दिलेला नामजप पूर्ण करतात. पूर्वी त्यांना प्रार्थना लिहून द्यावी लागायची. मुद्रा करण्याविषयी त्यांना ठाऊक नसल्याने त्याविषयी त्यांना सारखे सांगावे लागायचे. मीही त्यांना यासाठी वेळोवेळी साहाय्य करायचे. आता ते स्वतःच प्रार्थना करतात. ते नामजप करतांना कधीच भिंतीला टेकून बसत नाहीत. ते दिवसभरात ५ घंटे नामजप न कंटाळता करतात. त्यांच्या पायाला सूज असल्याने त्यांचे पाय दुखतात; पण त्याविषयी त्यांचे गार्‍हाणे नसते. मुद्रा करतांना त्यांचे हात दुखतात. त्या वेळेस ते मला म्हणतात, ‘‘माझा हात दुखत आहे. थोडा वेळ हात खाली ठेवू का ?’’ मी ‘हो’ म्हणताच अगदी थोडावेळ ते तसे करतात. मी त्यांना ‘नामजप होईपर्यंत मला मुद्रा करता येऊ दे’, अशी हाताला प्रार्थना करण्यास सांगितल्यावर ते तशी प्रार्थना करतात. ते दिवसभरातला नामजप पूर्ण करतात.

१ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) आठवणीने त्यांचे डोळे भरून येतात. ‘माझा पाय त्यांच्या कृपेनेच बरा झाला आहे’, असा त्यांचा भाव असतो. ते त्यांच्या पायाला सनातनच्या उदबत्तीची विभूती लावतात.

१ ऊ. ते प्रत्येक कृती शांतपणे करतात. ते स्थिर आहेत.

२. श्री. बिच्चू यांच्यात जाणवलेले पालट

अ. त्यांची त्वचा गुळगुळीत झाली आहे.

आ. त्यांचे हात गुलाबी रंगाचे झाले आहेत.

इ. त्यांचा तोंडवळा तजेलदार दिसतो.

ई. मला बरेच जण सांगतात, ‘‘काका पुष्कळ तेजस्वी दिसतात.’’

उ. त्यांचे केस पूर्वी पांढरे होते. आता त्यांचे बहुतांश केस काळे होत आहेत.

‘हे गुरुदेवा, माझे यजमान श्री. प्रभाकर बिच्चू यांच्यात झालेले पालट आपणच लिहून घेतलेत’, याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. वनिता प्रभाकर बिच्चू (पत्नी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (८.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक