Abu Dhabi Temple Dress Code : अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिरातही वस्त्रसंहिता लागू !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) – येथील स्वामीनारायण मंदिराचे १४ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर १ मार्चपासून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्याचसमवेत या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

१. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सभ्य पोशाख आवश्यक आहे. खांदे आणि गुडघे झाकणारे कपडे घालून यावेत, कपड्यांवर आक्षेपार्ह नक्षी किंवा लिखाण नसावे, परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी पारदर्शक किंवा घट्ट बसणारे कपडे घालून येऊ नये, असे भाविकांना सांगण्यात आले आहे. जर भाविकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही आणि कर्मचार्‍यांनी एखाद्याचा पोशाख अयोग्य मानला, तर त्यांना प्रवेशास प्रतिबंध केला जाऊ शकतो.

२. मंदिरात भ्रमणभाष संच, शस्त्र, धारदार वस्तू, लायटर आणि काडेपेटी नेण्यास बंदी आहे. वाहनतळासह संपूर्ण मंदिर परिसरात धूम्रपान, दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.