अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

विजय वडेट्टीवार

मुंबई, २९ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी ते बोलत होते.

साड्यांऐवजी शस्त्रे वाटावीत !

वडेट्टीवार म्हणाले की, अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीचे प्रावधान केले. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारी पैशातून मते मिळवण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. राज्यात दु:शासनाच्या औलादी मोकाट फिरत आहेत. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे त्यांना साड्यांऐवजी सरकारने शस्त्र वाटावीत. किमान त्या स्वत:चे संरक्षण करतील; कारण सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.