Shahjahan Sheikh Arrest : हिंदु महिलांचे लैंगिक शोषण करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अंततः अटक !

५५ दिवस होता पसार

तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे हिंदु महिलांच्या लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात, तसेच अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावर करण्यात आलेल्या आक्रमणाचा मुख्य सूत्रधार असलेला तृणमूल काँग्रेसचे नेता शेख शाहजहान याला अंततः बंगाल पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मीनाखान परिसरातील घरात शाहजहान शेख लपून बसला होता. तो ५५ दिवसांपासून पसार होता. कोलकाता उच्च न्यायालयाने शाहजहान प्रकरणी राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर शाहजहान शेख याला अटक करण्यात आली आहे.  शहाजहान याला अटक झाल्यानंतर संदेशखाली येथील महिलांनी होळी खेळून आनंद व्यक्त केला. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने शाहजहान याला ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.

पोलीस शाहजहान याला पंचतारांकित सुविधा देणार ! – भाजपचा आरोप

बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, शाहजहान शेख याची पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी येथे चांगली काळजी घेतली जाईल. त्याला कारागृहात पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सुविधा देण्यात येणार आहेत. त्याला एक भ्रमणभाषदेखील दिला जाईल, ज्याच्या साहाय्याने तो पक्ष ऑनलाईन चालवेल.

अटकेनंतरही उद्दामपणे चालत होता शेख शाहजहान !

शाहजहान शेख याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात नेत असतांनाची दृश्ये  वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली. त्या वेळी ‘पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि त्याच्या चेहर्‍यावर भीतीचे भाव आहेत’, असे किंचतही दिसत नव्हते. तो एका राजासारखा वावरत होता आणि पोलीस त्याच्या सेवेकर्‍यांसारखे दिसत होते. तो प्रसारमाध्यमांच्या कॅमेरार्‍यांसमोर हाताच्या बोटांद्वारे विजयी मुद्रा (व्ही आकार) करून दाखवत होता. यावरून भाजपनेही बंगालमधील तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. (तृणमूल काँग्रेसच्या राज्यात पोलिसांना कसलाही मान राहिलेला नाही, हेच यातून दिसून येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

उच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे बंगाल सकारने जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठीच त्याला अटक केली. तृणमूल काँग्रेस संवेदनशील असती, तर ५५ दिवस शाहजहान मोकाट फिरला नसता. त्याला अटक झाली, तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे हिंदूंना वाटत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच त्याला अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावरील आक्रमणाच्या प्रकरणी कह्यात घेऊन त्याचे खरे स्वरूप उघड करणे आवश्यक !