Mission Gaganyaan Astronauts : गगनयान मोहिमेसाठी अंतराळात जाणार्‍या ४ भारतीय अंतराळविरांची नावे घोषित !

पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा !

पंतप्रधान मोदी अंतराळविरांना शुभेच्छा देताना

थिरूवनंतपूरम् – ‘गगनयान’ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ‘इस्रो’ची आगामी महत्त्वाकांक्षी मोहीम असून यामध्ये अंतराळात मानवाला पाठवण्यात येणार आहे. रशिया, अमेरिका आणि चीन यांनंतर स्वबळावर असे करणारा भारत हा चौथा देश असणार आहे. याअंतर्गत ४ अंतराळविरांना अंतराळयानातनू पाठवण्यात येईल. प्रशांत बाळकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन् आणि शुभांशू शुक्ला अशी त्यांची नावे असून ते भारतीय वायूदलात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या केरळ दौर्‍यात दिली. त्यांनी या चौघांना मोहिमेला यश मिळावे म्हणून शुभेच्छाही दिल्या आहेत. वर्ष २०२५ च्या शेवटी अथवा २०२६ च्या आरंभी ही मोहीम राबवली जाईल.

या अंतराळयानाचे वजन ६ टन असणार आहे. पृथ्वीपासून अनुमाने ४०० किलोमीटर अंतरावर ३ दिवस हे यान प्रदक्षिणा घालेल. बेंगळुरू येथे या अंतराळविरांच्या प्रशिक्षणासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या चौघांनी रशियामध्येही काही काळ अंतराळवीर आणि अवकाश प्रवास यांसाठी आवश्यक ते प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात अमेरिकेची नासाही इस्रोला साहाय्य करणार आहे.

याआधी एप्रिल १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी तेव्हाच्या ‘सोव्हिएत रशिया’च्या यानातून अवकाश भ्रमंती करत भारताचे पहिले अंतराळवीर होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी अन्य देशांचे प्रतिनिधी म्हणून अंतराळवीर म्हणून अवकाश वारी केली आहे.