६ लाख रुपयांचे पारितोषिक असलेल्या महिला माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केले जेरबंद !

अनेक हिंसक घटनांमध्ये होता सहभाग !

नागपूर – ‘टीसीओसी’ (नक्षलवाद्यांची सशस्त्र आक्रमक मोहीम) कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्याला अटक केली आहे. राजेश्वरी उपाख्य कमला पाडगा गोटा (वय ३० वर्षे) असे तिचे नाव आहे. तिच्यावर ६ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते.

१. फेब्रुवारी ते मे या कालावधीत माओवादी ‘टीसीओसी’ कालावधी साजरा करतात. या कालावधीत ते सरकारी मालमत्तेची हानी करणे, सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण करणे आणि इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इत्यादी देशविघातक कृत्ये करतात.

२. एप्रिल २०२३ मध्ये केडमारा अरण्य परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने आरोपी जहाल महिला माओवादी राजेश्वरी गोटा हिला गडचिरोली पोलीस दलाने विशेष अभियान राबवून अटक केली होती. यापूर्वी तिच्याविरुद्ध भामरागड येथे विविध कलमांनुसार गुन्हे नोंद होते.