१. दैनिक वितरणाच्या सेवेला जाण्याच्या नेहमीच्या मार्गाऐवजी गाईला ‘गोग्रास’ देण्यासाठी मार्ग पालटणे आणि त्यामुळे त्याच कालावधीत झाडाची फांदी पडून होणारा संभाव्य अपघात देवाने टाळणे
‘एकदा मी ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करायला जात असतांना आईने गाईला देण्यासाठी माझ्याजवळ ‘गोग्रास’ दिला होता. मला गाईला ‘गोग्रास’ देण्यासाठी नेहमीच्या मार्गाऐवजी (रस्त्याऐवजी) दुसर्या मार्गाने जावे लागले. त्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता. नंतर मी घरी परत येत असतांना समजले की, मी वितरणासाठी जात असलेल्या माझ्या नेहमीच्या मार्गावर त्याच वेळी एक अपघात झाला होता. एका झाडाची फांदी पडून बरेच जण जखमी झाले होते. तेव्हा ‘गोग्रास’ देण्याच्या माध्यमातून देवानेच मार्ग पालटायला लावून मला वाचवले’, हे माझ्या लक्षात आले.
२. धर्मसेवा आणि गुरुसेवा करत असूनही कुत्र्यांची भीती वाटणे अन् शरणागतभावाने प्रार्थना करण्यास आरंभ केल्यावर भीती निघून जाणे
मी पहाटे दैनिकाचे वितरण करतांना मार्गात अनेक ठिकाणी भटके कुत्रे असतात आणि ते बर्याच जणांना चावतात. मलासुद्धा एकदा कुत्रा चावला होता. एके दिवशी पहाटे मी पाहिले की, एक वेडसर व्यक्ती कुत्र्यांना न घाबरता त्या मार्गावर फिरत होती. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘ही वेडसर व्यक्ती जर इथून इतकी निर्भयपणे फिरू शकते, तर मी का फिरू शकणार नाही ? मी तर धर्मसेवा आणि गुरुसेवा करत आहे.’ त्या वेळी देवाने माझ्याकडून प्रार्थना अल्प होत असल्याचे लक्षात आणून दिले. तेव्हा मी शरणागतभावाने प्रार्थना करू लागलो. तेव्हापासून माझ्या मनात कुत्र्यांविषयी असलेली भीती निघून गेली. त्यानंतर मला वितरणाची सेवा करतांना कोणतीही अडचण आली नाही.
३. ‘साधकांचे साधनावृद्धीचे प्रयत्न व्हायला हवेत’, यासंदर्भात सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी दिलेली पूर्वसूचना !
मला ‘साधकांची प्रगती व्हावी’, असे वाटत होते; परंतु ‘त्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत ?’ हे मला समजत नव्हते. एक दिवस दैनिक वितरण करतांना मला पुढीलप्रमाणे जाणवले. ‘माझ्या एका बाजूने भगवान श्रीकृष्ण माझा हात धरून चालत आहे आणि तो ‘माझ्यासोबत चल’, असे मला सांगत आहे, तर दुसर्या बाजूने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझा हात धरून चालत आहेत आणि ते सांगत आहेत, ‘तू श्रीकृष्णासमवेत रहा !’; परंतु मी मात्र एकाच जागी खिळून राहिल्यासारखा स्तब्ध उभा आहे. ‘असे का होत आहे ?’, हे मला समजत नव्हते. त्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना शरणागतभावाने प्रार्थना केली आणि मला जाणीव झाली, ‘एकाच ठिकाणी थांबून रहाणे, हे आपल्यातील स्वभावदोषांचे प्रतीक आहे.’ त्यांवर मात करणे, म्हणजे भगवान श्रीकृष्णासमवेत राहून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न वाढवणे. ‘आम्हा सर्वांची व्यष्टी साधना चांगली व्हायला हवी, हेच या प्रसंगात भगवंताला मला शिकवायचे आहे’, असे माझ्या लक्षात आले.
या अनुभूतीनंतर थोड्याच दिवसांनी सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आम्हा सर्व साधकांना ‘साधनावृद्धीचे’ ध्येय घेण्यास सांगितले. तेव्हा वरील अनुभूती म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी मला साधकांचे साधनावृद्धीचे प्रयत्न व्हायला हवेत’, यासंदर्भात दिलेली पूर्वसूचनाच होती’, असे मला वाटले.’
– श्री. शांताराम बेदरकर, नांदेड (३०.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |