भावावस्थेत असणार्‍या आणि अहं नसलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सूक्ष्मातील जाणणार्‍या साधिका म्हणजे त्यांची शस्त्रेच !

१. देवाने सूक्ष्मातील कळणारे बरेच साधक देणे आणि सर्वांची उत्तरे एक येणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘देवाने आम्हाला असे साधक दिले होते की, त्यांना सूक्ष्मातील बरेच कळायचे. कु. कविता राठीवडेकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), कु. सुषमा पेडणेकर (आताच्या सौ. सुषमा नाईक, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) , कु. रसिका परब (आताच्या सौ. रसिका ठाकूर). कु. कविता आणि कु. सुषमा यांच्याकडे चांगली सूक्ष्म दृष्टी होती. बर्‍याचदा परीक्षण करतांना त्यांना सूक्ष्मातील दिसायचे, तर मला जाणवायचे; परंतु आमची उत्तरे जवळजवळ एकच असायची.

२. सूक्ष्म जाणण्याला मर्यादा नसल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभी जवळच्या घटनांचे आणि नंतर दैवी शक्तीच्या साहाय्याने दूरवर असलेल्या स्थानांचे अथवा घटनेचे परीक्षण करण्यास शिकवणे

एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला मुंबई मराठी साहित्य संमेलनाचे सूक्ष्म परीक्षण करण्यास  सांगितले होते. या वेळी हे परीक्षण आम्ही गोव्यात बसून करणार होतो. सूक्ष्म जाणण्याला काही मर्यादा नसते, हेच परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला या प्रसंगातून शिकवले. प्रथम आम्ही गोव्यात आश्रमात बसून गोव्यातीलच स्थानांचे परीक्षण करत असू; परंतु परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘सूक्ष्म हे अमर्याद आहे. मनाला एका क्षणात कुठेही जाता येते. मनाचा वेग बराच असतो. या सूक्ष्म वेगाचा उपयोग करून आपल्याला दैवी शक्तीच्या साहाय्याने दूरवर असलेल्या स्थानाचे अथवा घटनेचे परीक्षण करता येते. तुम्हीही करून पहा.’’ अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म परीक्षणाच्या आणखी पुढच्या टप्प्यात नेले आणि दूरवर असलेल्या स्थानांचे परीक्षण करण्यास शिकवले. या घटनांतून आमचा आत्मविश्वासही वाढला.

३. साधकांना त्रास होऊ नये; म्हणून आधीच सूक्ष्मातून त्रासाची तीव्रता काढणे आणि देव-असुर यांच्यामध्ये चाललेल्या लढ्याची सूक्ष्म परीक्षणे करणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

कु. कविता राठिवडेकर हिला सूक्ष्मातील पुष्कळ चांगले कळायचे. देव आणि असुर यांच्यामध्ये चाललेल्या सूक्ष्मातील लढ्याची अनेक सूक्ष्म परीक्षणे आम्ही दोघींनी केली. तेव्हा गुरुदेव आम्हा दोघींना सांगत, ‘‘सकाळी सेवा चालू करण्यापूर्वी आज कोणत्या शहरातील कोणत्या सेवाकेंद्रात वाईट शक्तींचा त्रास वाढणार आहे, हे आधीच सूक्ष्मातून काढा आणि आधीच तेथे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास आरंभ करा, म्हणजे साधकांना अधिक त्रासांना सामोरे जावे लागणार नाही.’’

४. विविध ठिकाणी होणार्‍या त्रासांसाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी घंटोन्‌घंटे नामजप करवून घेऊन एकाच जागी बसून नामजप करण्याचा टप्पा पूर्ण करवून घेणे

बर्‍याचदा मिरज सेवाकेंद्र, देवद आश्रम येथून आम्हाला दूरध्वनी यायचे की, या या साधकांचा त्रास वाढला आहे. त्यानंतर आम्हा दोघींना गुरुदेव त्या साधकांचा त्रास अल्प होण्यासाठी नामजप करण्यासाठी बसवायचे. बर्‍याचदा विविध ठिकाणी होणार्‍या अनेक घटनांसाठी आम्ही दिवसभर जवळजवळ ११ घंटे नामजप करत असू. मी माझ्या आयुष्यात एवढे घंटे नामजप कधीच केला नाही. मला वाटते, माझा हा एका जागी बसून नामजप करण्याचा टप्पा गुरुदेवांनी त्याच वेळी पार पाडला असावा. त्यानंतर एवढे घंटे नामजप करण्याची वेळ कधीच माझ्यावर आली नाही. त्या वेळी गुरुदेवांनी ‘एका जागी बसून न कंटाळता घंटोन्‌घंटे बसून सूक्ष्म परीक्षण कसे करायचे’, याचीही शक्ती आम्हाला दिल्याने ते शक्य झाले. साधारणतः सूक्ष्म इतिहासातील अशा अनेक घटना प्रथमच अनुभवण्याचा कालावधी वर्ष २००० ते वर्ष २००५ एवढा होता. नंतरही अनेक प्रसंग घडले, त्यात गुरुदेवांनी आम्हाला शिकवलेही; परंतु पहिली ५ वर्षे गुरुदेवांनी आम्हाला अखंड शिकवले.

५. सूक्ष्मातील जाणणार्‍या साधिका 

५ अ. कु. रसिका परब (आताच्या सौ. रसिका ठाकूर)

५ अ १. अल्प शिक्षण असूनही मुंबई येथील साहित्यसंमेलनाचे तंतोतंत परीक्षण करणे आणि ते पाहून भाव जागृत होणे : कु. रसिका गोव्यातील खेडेगावातून आली होती. तिच्याविषयीचा एक प्रसंग येथे नमूद करण्यासारखा आहे. कु. रसिकाची भाषा कोकणी होती आणि ती अधिक शिकलेली नव्हती; परंतु तिने केलेले मराठी साहित्य संमेलनाचे परीक्षण पाहून मी थक्क झाले. ‘तेथे संमेलनात जमलेले साहित्यिक मराठी भाषेविषयी काय काय म्हणाले’, हे तिने अगदी तंतोतंत बरोबर सांगितले होते. खरंच, देवाने आम्हाला असे उत्तम सूक्ष्म दृष्टी असणारे साधक दिले आहेत, हे पाहून माझा गुरुदेवांप्रती भाव जागृत झाला. गुरुदेवांच्या तळमळीमुळेच सनातन संस्थेत असे दैवी गुणसंपन्न साधक एकत्रित झाले होते.

५ आ. कु. कविता राठिवडेकर आणि कु. सुषमा पेडणेकर (आताच्या सौ. सुषमा नाईक)

५ आ १. भावावस्थेत असल्याने आणि अहं नसल्याने देवाने सूक्ष्मातील कठीण आणि अगम्य ज्ञान साधिकांना देणे : कु. कविता राठिवडेकर आणि कु. सुषमा पेडणेकर (आताच्या सौ. सुषमा नाईक) याही खरे तर अगदी खेडेगावातून आलेल्या साधिका; परंतु अध्यात्माचे काहीही वाचन न करता सूक्ष्म परीक्षणात अगदी अध्यात्मातील मोठमोठे शब्द त्या कशा उपयोगात आणायच्या, याचेच मला आश्चर्य वाटायचे. हे सर्व खरंच दैवी होते. मला या साधिकांचा सहवास पुष्कळ लाभला. मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकता आले. त्या सतत भावावस्थेत असायच्या आणि म्हणूनच ईश्वर त्यांना सूक्ष्मातील कठीण अन् अगम्य असे ज्ञान देत होता. महत्त्वाचे म्हणजे त्यांना ‘मला सूक्ष्मातील कळते’, याचा अहं नसायचा. सूक्ष्म परीक्षण करून परत त्या सहसाधकांमध्ये अगदी सहज मिसळायच्या. नाहीतर ‘सूक्ष्मातील कळते’, याचा अहं किती झाला असता ना !

५ इ. कु. अपर्णा बाणावलीकर (आताच्या सौ. पूनम नाईक)

५ इ १. समष्टीसाठी एका जागी घंटोन्‌घंटे बसून नामजप करण्याची अफाट क्षमता असणे : अशीच एक साधिका कु. अपर्णा बाणावलीकर ! तिच्यात समष्टीसाठी नामजप करण्याची आणि न हलता एका जागी घंटोन्‌घंटे बसण्याची अफाट क्षमता होती. एकदा ती नामजपाला बसली की, जरासुद्धा हलत नसे. अशी अफाट क्षमता मी आजपर्यंत कुणामध्ये पाहिली नाही. त्या वेळी गुरुदेवांकडे असलेल्या सूक्ष्मातील जाणणार्‍या या साधिका म्हणजे जणुकाही गुरुदेवांची शस्त्रेच होती.

५ ई. कु. कल्याणी गांगण

५ ई १. सूक्ष्म जगताला जाणण्याची अफाट क्षमता असणे : कु. कल्याणी गांगणकडेही अशीच सूक्ष्म जगताला जाणण्याची अफाट क्षमता होती.

या मुली अगदी साध्या होत्या. कसलाही अहं नाही, कसलाही दिखावा नाही. मी या साधिकांकडे पाहूनच अध्यात्मात सहज अहंविरहित वावरण्याला किती महत्त्व आहे, हे शिकले.

५ उ. सौ. मंगला मराठे

५ उ १. धामसे सेवाकेंद्रात सूक्ष्माविषयीचे कार्य करून ‘सूक्ष्म वार्ता’ देणारे सूक्ष्मातील वार्ताहर बनणे : सौ. मंगला मराठे या धामसे सेवाकेंद्रात असेच सूक्ष्माविषयी मोठे कार्य करत होत्या. ‘त्या दिवसरात्र कशा सेवा करू शकायच्या ?’, याचा मला प्रश्न पडे. त्यांना मी कधी थकलेले पाहिले नाही. त्या सतत उत्साही असायच्या. दिवसभर त्रास असणार्‍या साधकांच्या सहवासात राहूनही त्यांना थकवा आलेला मी कधीच पाहिला नाही. ‘अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेल्या साधकांमध्ये सनातनची खरी शक्ती दडलेली आहे’, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. असे साधकांना निर्माण करणारे गुरु किती महान असतील नाही का !

त्या वेळी ‘सूक्ष्म वार्ता’ अशा नावाचे सदर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून यायचे. सौ. मंगलाताई धामसेहून काही सूक्ष्म वार्ता पाठवायच्या आणि मी फोंडा, सुखसागर आश्रमात घडलेल्या वार्ता लिहायचे. अशा प्रकारे गुरुदेवांनी आम्हाला एक प्रकारे सूक्ष्मातील वार्ता देणारे वार्ताहरही बनवले.

६. परात्पर गुरु डॉक्टरांनी ते नामजपाला बसल्यावर घडणार्‍या घटनांचे सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगणे आणि सर्व साधिकांचे परीक्षण टंकलेखन करून झालेल्या धारिका पडताळून देण्यास सांगणे

बर्‍याचदा गुरुदेव स्वतः नामजपाला बसायचे आणि आम्हाला परीक्षण करण्यास सांगायचे. त्या वेळी आम्ही साधिका ‘गुरुदेवांकडून आताच्या घडीला काय झाले ? त्याचा दूरच्या स्थानावर काय परिणाम झाला ? यावर वाईट शक्तींनी गुरुदेवांना काय प्रत्युत्तर दिले ?’, हे तंतोतंत सांगत होतो. सर्व गुरुकृपेमुळेच शक्य होत होते. आम्ही या सर्व नोंदी वहीत लिहून त्यानंतर आमचे सूक्ष्म परीक्षण संगणकावर टंकलिखित करत असू. त्यानंतर गुरुदेवांनी मला सांगितले की, आता तुम्ही या साधिकांनी टंकलेखन केलेल्या धारिका पडताळून लगेच मला द्या. अशा प्रकारे गुरुदेवांनी माझी ही क्षमता वाढवली. मी सूक्ष्म परीक्षण करून इतर सूक्ष्मातील जाणणार्‍या साधिकांच्या धारिकाही पडताळू लागले.

७. ‘साधकाला प्रारब्धाची झळ बसू न देता त्याला वर्तमानात आनंदी ठेवणे हे गुरूंचे कार्य असते; परंतु साधकाने त्यांचे छत्र आणि चरण सोडता कामा नये’, हेच अध्यात्माचे मूळ सूत्र असणे

‘साधक घडतांना तो सर्वांगीण घडला पाहिजे. त्याला सर्वकाही आले पाहिजे’, ही अध्यात्मातील गुरुदेवांची तळमळच आम्हा साधकांना अध्यात्मात पुढच्या पुढच्या टप्प्याकडे नेत होती. अध्यात्मातील प्रवास करतांना आता हे माझ्या लक्षात येऊ लागले होते. गुरु जीवनात आले की, साधकाच्या जीवनात प्रतिदिन अनेक घटना घडतात आणि त्या आयुष्यातून निघूनही जातात. याचा परिणाम साधकावर होऊ न देता, त्याला परत वर्तमानात आनंदी ठेवणे, हे गुरूंचे कार्यच असते. ‘गुरु साधकाला प्रारब्धाची झळ बसू देत नाहीत; मात्र आपण त्यांचे छत्र आणि चरण सोडता कामा नये’, हेच अध्यात्माचे मूळ सूत्र असल्याचे मला उमगू लागले, नव्हे ‘त्यांच्याच कृपेने उमगले’, असेच म्हणायला हवे.’
(क्रमश:)

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (८.२.२०२२)

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे विचारधन !

‘जिवाने साधना केली नसेल, तर त्याला मृत्यूनंतर गती मिळण्यास फार कठीण होते’; म्हणून जिवाने जिवंतपणी गांभीर्याने साधना करून मुक्त होणे आवश्यक असणे

‘बर्‍याच वेळा मनुष्य मायेत इतका गुंतलेला असतो की, त्याला साधनेचे महत्त्व मृत्यूनंतर कळते. जिवाने साधना केली नसेल, तर त्याला मृत्यूनंतरची गती मिळणे कठीण होते; परंतु तेव्हा लक्षात येऊन काही उपयोग नसतो; कारण पुन्हा नरजन्म मिळणे अवघड असते. त्यामुळे मनुष्यदेह असेपर्यंतच गांभीर्याने साधना करून मुक्त व्हावे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.