Russian Army Released Indians : रशियाच्या सैन्याने भरती केलेल्या अनेक भारतीय तरुणांना सोडले !

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा दावा !

नवी देहली – रशियामध्ये नोकरीच्या आमिषामुळे झालेल्या फसवणुकीमुळे तेथील सैन्यात भरती झालेल्या भारतियांच्या संदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसारित केले आहे. यात म्हटले आहे, ‘आम्ही या प्रकरणाचा प्राधान्याने विचार करत आहोत आणि रशियाच्या सरकारच्या संपर्कात आहोत. यातून भारतियांना लवकरात लवकर रशियाच्या सैन्यातून बाहेर काढता येईल. हे सूत्र उपस्थित केल्यानंतर अनेक भारतीय नागरिकांना रशियाच्या सैन्याने सोडले आहे.’

परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, आम्ही काही चुकीच्या बातम्या पाहिल्या आहेत, ज्यामध्ये काही भारतीय मुक्त होण्यासाठी रशियाच्या सैन्याकडे साहाय्य मागत आहेत. अशा प्रत्येक प्रकरणाची माहिती मॉस्कोमधील भारतीय दूतावासाला देण्यात आली आहे. दूतावासाने हे प्रकरण रशियाच्या सरकारकडे मांडले आहे.

लाखो रुपयांच्या वेतनाच्या आमिषामुळे झाली फसवणूक !

रशियाच्या सैन्यात काम करणार्‍या भारतियांना रशियातील आस्थापनांमध्ये साहाय्यक म्हणून काम करण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. यासाठी त्यांना लाखो रुपयांचे वेतन देण्यात येणार, असे सांगण्यात आले होते. यामुळे जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, पंजाब आणि गुजरात राज्यांतून रशियात गेलेल्या भारतीय तरुणांना रशियाच्या सैन्यात भरती करून युक्रेन सीमेवर तैनात करण्यात आले. अशा प्रकारे फसवणूक झाल्यानंतर या तरुणांनी  भारत सरकारकडे साहाय्य मागितले. या तरुणांची पारपत्रे काढून घेण्यात आली आहेत.