मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून आरोप-प्रत्यारोप !
मुंबई – मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्वतःवर होत असलेल्या आरोपांचे खंडण करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर ते मुंबई येथे ‘सागर’ बंगल्यावर जाण्यासाठी निघाले. मनोज जरांगे यांचे सहकारी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असूनही त्यांनी त्यांचे ऐकले नाही. भांबेरी गावातील गावकर्यांनी ठिय्या आंदोलन करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी ‘माझी वाट अडवू नका’, असे सांगून आपला प्रवास चालूच ठेवला. कथित कीर्तनकार अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी मरायला सिद्ध आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याविरोधात षड्यंत्र रचायला आरंभ केला आहे; मात्र मी घाबरणार नाही. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच आहेत. मी फडणवीसांचा ब्राह्मणी कावा चालू देणार नाही. मला सलाईनमधून विष पाजून मारण्याचा कट रचल्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणेही बंद केले आहे. यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात आहे. ‘मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा’, असे आव्हान जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून तुतारीचा वास येत आहे. हा लढा मराठा समाजापर्यंत मर्यादित ठेवावा.
भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ‘सिल्व्हर ओक’ आहे कि जालना जिल्ह्यातील भैया कुटुंब ? जरांगेंनी त्यांची नौटंकी बंद करावी.
सागर बंगल्याची भिंतही त्यांना ओलांडता येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.