|
जयपूर (राजस्थान) – हिंदु विद्यार्थ्यांवर नमाजपठण करण्यासाठी दबाव टाकणार्या सरकारी शाळेतील फिरोज खान आणि मिर्झा मुजाहिद या २ शिक्षकांना राज्याचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी निलंबित केले आहे. हे शिक्षक बंदी घातलेल्या एका संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप आहे. ही घटना कोटा जिल्ह्याच्या खजुरी ओडपूर गावातील आहे. या संदर्भात स्थानिक लोकांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन देऊन या घटनेची माहिती दिली होती. या प्रकरणात शबाना ही शिक्षिकाही सहभागी असून तिच्यावरही कारवाई केली जाणार आहे. ‘नमाजपठणाला नकार दिल्यास तुझे भविष्य उद्ध्वस्त करू’ अशी धमकी या विद्यार्थ्यांना दिली जात होती.
आम्ही राजस्थानातील शाळांना धर्मांतराचे अड्डे बनू देणार नाही ! – शिक्षणमंत्री
शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी सांगितले की, शाळेत धर्मांतर करणे, विद्यार्थिनीचा धर्म पालटणे, विद्यार्थिनींना बलपूर्वक नमाजपठण करायला लावणे अशा तक्रारी आल्या होत्या. याप्रकरणी २ शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षिकेवरही कारवाई करण्यात येत आहे. या तिघांनाही बिकानेर मुख्यालयात उपस्थित रहाण्याची सूचना देण्यात आली आहे. शिक्षणाची मंदिरे ही मुलांचे भविष्य घडवण्याची केंद्रे असली पाहिजेत. ती धर्मांतराची प्रयोगशाळा नसावी. आम्ही राजस्थानातील शाळांना धर्मांतराचे अड्डे बनू देणार नाही. शिक्षकांची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास ते बडतर्फ करण्यास मागेपुढे पहाणार नाही.
‘पूजा’ किंवा ‘नमाज’ यांच्या नावाखाली शाळा बंद ठेवणार्यांना कायमचे घरी बसवणार !
एका कार्यक्रमात मदन दिलावर म्हणाले की, ‘पूजा’ किंवा ‘नमाज’ यांच्या नावाखाली शिक्षक २ ते ४ घंटे शाळा बंद ठेवतात, असे मी पाहिले आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची हानी होते. ‘पूजा’ किंवा ‘नमाज’ यांच्या नावाखाली शाळेतून गायब राहिल्यास अशा शिक्षकांनी सुट्टी घ्यावी. जर सतत असेच होत असेल, तर त्यांना निलंबित केले जाईल. त्यानंतरही सुधारणा झाली नाही, तर सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. अशांना कायमचे घरी पाठवले जाईल. अनेक शिक्षक वर्षानुवर्षे शिकवायला शाळेत येत नाहीत. मी त्यांच्याकडून वेतनाची संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करीन, तसेच मुलांची किती हानी झाली, याचे मूल्यमापन करून संपूर्ण रक्कम जोडून वसूल केली जाईल. राजस्थानमध्ये हे पहिल्यांदाच घडणार आहे.
“‘शाळांमध्ये किंवा बाहेर मुलींची छेडछाड करणार्यांना सोडू नये, अशी सूचना दिली आहे !’”
आता पंचायतीच्या बांधकामात ग्रामविकास अधिकारी दोषी आढळल्यास बीडीओवरही (ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरवरही) कारवाई केली जाईल. अनेक अधिकारी प्रामाणिक असले, तरी काही अप्रामाणिकही आहेत. खालपासून वरपर्यंत ‘कमिशन’ घेतले जाते. त्यामुळे कामाचा दर्जा खालावतो. अशा लोकांवर कारवाई केली जाईल.
– शिक्षणमंत्री मदन दिलावर
संपादकीय भूमिका
|