Halal Certificate Case : उत्तरप्रदेश पोलिसांकडून ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी यांची चौकशी !

हलाल प्रमाणपत्राचे प्रकरण

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने हलाल प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या प्रकरणी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष आणि ‘हलाल फाऊंडेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना महमूद असद हुसैन मदनी यांची चौकशी केली. मदनी यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी वेळ मागितला आहे. यापूर्वी १३ फेब्रुवारी या दिवशी लक्ष्मणपुरी पोलिसांनी ‘हलाल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या ४ पदाधिकार्‍यांना योग्य नमुने किंवा चाचणी न करता आस्थापनांना बनावट हलाल प्रमाणपत्रे दिल्यावरून अटक केली होती.

हलाल प्रमाणपत्राच्या प्रकरणी २५ जानेवारी या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने हलाल-प्रमाणित उत्पादनांवर बंदी घातल्याविषयी नोंदवलेल्या फौजदारी खटल्याच्या संदर्भात महमूद मदनी आणि इतरांविरुद्ध कोणत्याही कारवाईपासून संरक्षण दिले होते. उत्तरप्रदेश सरकारच्या हलाल प्रमाणित उत्पादनांचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वितरण यावर बंदी घालण्याला आव्हान देणार्‍या याचिकांवरून न्यायालयाने सरकारला नोटीसही बजावली होती. या याचिकांमध्ये हलालवर बंदी घालणारी अधिसूचना रहित करण्याची मागणी करण्यात आली आहे.