शाळेतील सुरक्षिततेच्या नियमांविषयी महापालिका प्रशासनाचे विभाग अनभिज्ञ !

पिंपरी (पुणे) – शाळेमध्ये तिसर्‍या मजल्यावर ग्रीलवरून (लोखंडी कठडा) घसरून पडल्याने सार्थक कांबळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या सुरक्षेच्या त्रुटी उघडकीस आल्या आहेत. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्नीशमन विभाग आणि शिक्षण विभाग शाळेतील सुरक्षिततेच्या नियमनाविषयी अनभिज्ञ आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. जिन्याच्या ग्रीलला सुरक्षा जाळी बसवलेली नाही, तसेच घटना घडली त्या वेळी सुरक्षारक्षक जागेवर नव्हते. प्रथमोपचार पेटीही उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना शाळेच्या सुरक्षिततेसंदर्भात नियम घालून दिले आहेत. अकस्मित प्रसंग घडल्यास मुलांचे पालक येईपर्यंत मुलांचा ताबा महिला शिक्षकांकडे असावा. शाळा सुटल्यानंतर वर्ग, तसेच प्रसाधनगृह यामध्ये विद्यार्थी नसल्याची निश्चिती करावी. शाळेतील पाण्याच्या टाकीचे झाकण लावल्याची खातरजमा करावी. शाळेतील गच्चीचा दरवाजा बंद असावा. शाळेतील कठड्यांची उंची नियमानुसार असावी, तसेच जिन्याच्या ग्रीलला सुरक्षा जाळी बसवावी यांसह अनेक सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडे दिले असून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षण विभागाचे साहाय्यक आयुक्तांनी दिली.

संपादकीय भूमिका

  • सुरक्षिततेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या शाळेवर कठोर कारवाईच व्हायला हवी !
  • शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जाणीव करून देणे, हे शाळेसाठी लज्जास्पद आहे !