ऐरोली येथील वर्ष २०१२ मध्ये बांधलेल्या अनधिकृत मशिदीचे प्रकरण
नवी मुंबई, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – ऐरोली येथील मैदान आणि उद्यान यांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत मशीद बांधण्यात आली आहे. तिच्यावर कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने महापालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी अशोक अहिरे यांना घेराव घातला होता. डिसेंबर २०२३ मध्येही कारवाईसाठी ऐरोली विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने या बांधकामाला नोटीस बजावली होती; मात्र पुढे कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे १६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत अशोक अहिरे यांना विभाग कार्यालयात घेराव घालून संबंधित बांधकामावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
१. ऐरोलीमध्ये सेक्टर ३ येथील भूखंड क्र. ११ बी येथे वर्ष २०१२ पासून अनधिकृत मशीद आणि मदरसा आहे. (अनधिकृत बांधकामे झाली असतांना गेली १२ वर्षे प्रशासन झोपले होते का ? – संपादक) पालिकेच्या उद्यान आणि मैदान यांसाठीच्या राखीव जागेवर हे बांधकाम करण्यात आले आहे. पालिका अधिकारी आणि स्थानिक नेते यांच्या पाठबळामुळे याविरोधात कारवाई केली जात नाही.
२. ९ डिसेंबर २०२३ या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ऐरोली विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. १२ डिसेंबर या दिवशी पालिका मुख्यालयात उपायुक्त राहुल गेठे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी २० दिवसांत अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते; पण तसे झालेले नाही. त्यामुळे पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात आले.
२४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी !
पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पुन्हा कारवाईचे आश्वासन देण्यात आले. यानंतर धर्मप्रेमींनी आंदोलन स्थगित केले. २४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही धर्मप्रेमींकडून देण्यात आली आहे. |
संपादकीय भूमिका :‘अनधिकृत मशिदीवर कारवाई करा’, हे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना का सांगावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? या प्रकरणात निष्क्रीय रहाणार्या प्रशासकीय अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे ! |