७ कोटींहून अधिक जणांचा ‘ऑनलाईन’ रमी खेळात सहभाग !

भारताला ‘रमी सर्कल’चा विळखा !

मुंबई, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘रमी खेळा आणि पैसे जिंका’ असे विज्ञापन सध्या सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात चालू आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार, प्रसिद्ध क्रिकेटपटू आदींकडून ‘रमी सर्कल अ‍ॅप’ डाऊनलोड करून हा खेळ खेळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

https://www.rummycircle.com/index-marathi.html’ या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सध्या भारतातील ७ कोटींहून अधिक जणांनी रमी खेळण्यासाठी ‘रमी सर्कल अ‍ॅप’ डाऊनलोड केला आहे.

युवकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची प्रलोभने !
या ऑनलाईन खेळाला सर्वोच्च न्यायालयाकडून ‘कौशल्याचा खेळ’ अशी मान्यता देण्यात आली आहे. हा खेळ मनोरंजन म्हणून आणि पैसे कमवण्यासाठी या दोन्ही प्रकारे खेळता येतो; मात्र प्रथितयश व्यक्तींकडून ‘रमी खेळा आणि पैसे कमवा’ या विज्ञापनांचे सतत प्रक्षेपण करून युवकांना पैसे कमवण्याच्या हेतूने हा खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. प्रसिद्ध व्यक्तींकडून विज्ञापन करण्यात येत असल्यामुळे भारतातील युवा वर्ग याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.

‘https://www.rummycircle.com/index-marathi.html’ या संकेतस्थळावर भारताचे सर्वांत मोठे ऑनलाईन रमी संकेतस्थळ म्हणून प्रचार करण्यात येत आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी या संकेतस्थळावर रमी खेळून सर्वाधिक पैसे कमवलेल्या युवकांच्या प्रतिक्रिया आणि ‘त्यांनी किती पैसे कमवले’, याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरांतील युवकांची संख्या अधिक आहे. हा खेळ २४ घंटे चालू ठेवण्यात आला असून युवकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची प्रलोभनेही ठेवण्यात आली आहेत.

कायद्यात पालट करण्यासाठी राज्यशासनाच्या केंद्रशासनाला सूचना !

विधीमंडळाच्या उन्हाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी ‘ऑनलाईन’ जुगाराचा प्रश्‍न उपस्थित करून त्याचे विज्ञापन केल्याप्रकरणी सभागृहात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा निषेध केला होता. यावर उत्तर देतांना महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यामध्ये आवश्यक तो पालट करण्याविषयी महाराष्ट्र शासनाकडून केंद्रशासनाला कळवण्यात येणार असल्याची माहिती सभागृहात दिली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाकडूनही प्रक्रिया चालू आहे.

संपादकीय भूमिका

कायदेशीर आधार घेऊन युवकांना जुगाराकडे ओढणार्‍या ऑनलाईन खेळांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक !