डान्सबारला पोलिसांचेच संरक्षण ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

पोलीस, पोलिसांचे खबरे, स्थानिक गुंड यांना हप्ते !

मुंबई – मुंबई येथे ऑर्केस्ट्राच्या आड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे ५ वाजेपर्यंत डान्सबार चालू आहेत. येथील या डान्सबारना पोलिसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर धाड घालून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी केली.

याविषयी विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बारचालकांनी ‘सिंडिकेट’ (व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी केलेले स्वयं-संघटित गट किंवा व्यावसायिकांची तात्पुरती युती) सिद्ध केले आहेत. या  ‘सिंडिकेट’मधील बारचालक मासाला लाखो रुपये जमा करत आहेत. जमा झालेल्या रकमेतून पोलिसांना, पोलिसांच्या खबर्‍यांना, स्थानिक गुंडांना हफ्ते दिले जात आहेत. त्यामुळे ‘सिंडिकेट’मधील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. डान्सबार पहाटेपर्यंत चालू आहेत. याविषयी स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार देऊनही डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. याउलट ‘सिंडिकेट’मधील बारचालक तक्रारदारालाच धमक्या देऊन मारहाण करत आहेत. या संदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

संपादकीय भूमिका

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप खरे असतील, तर याची सरकारने गांभीर्याने नोंद घेऊन डान्सबार बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !