शिवसृष्टीची पहाणी केली जाईल. त्यानंतर आवश्यक असणार्या दुरुस्तीसह डागडुजीही केली जाईल. – सतीश वाघमारे, ‘ह’ प्रभागातील स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता
पिंपरी ( जिल्हा पुणे) – महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या ‘शिवसृष्टी’ची दुरवस्था झाली आहे. समयमर्यादेमध्ये स्वच्छता न केल्यामुळे सगळीकडे कचरा झाला आहे, तसेच तेथील ‘म्युरल्स’वर (शिल्पांवर) धूळ बसली आहे. ‘शिवसृष्टी’ पहाण्यासाठी सिद्ध केलेल्या पदपथांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. (या विक्रेत्यांना महापालिकेतील अधिकार्यांचे अभय आहे काय? असा प्रश्न निर्माण होतो ! – संपादक) त्यामुळे ‘शिवसृष्टी’चे विद्रुपीकरण झाले आहे. (शिवसृष्टीची देखभाल न करणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार सामान्य नागरिकांच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक) १९ फेब्रुवारी या दिवशी ‘शिवजयंती’ असल्याने ‘शिवसृष्टी’च्या स्वच्छतेसह दुरुस्ती करण्याची मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
या ‘शिवसृष्टी’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकानंतरच्या कर्नाटक स्वारीपर्यंतचे भव्य शिल्प उभारण्यात आले आहेत. त्या शिल्पांवर लावण्यात आलेली शोभेची झालरही २ ठिकाणी निखळली आहे. ‘शिवसृष्टी’च्या समोर उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या खांबांवर नागरिक बसतात. त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आसंद्या आणि टेबल मांडले आहेत. त्यामुळे पदपथाचा वापर नागरिकांना करता येत नाही. तसेच रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा ढीग पडलेला असतो. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने दुरवस्था झालेली आहे. रायगड दरवाजाचे प्रतिकात्मक शिल्प उभारण्यात आले आहे. त्या शिल्पाच्या वरील भागांतील मोठमोठे दगड निखळून पडत आहेत.