आज पू. गुरुनाथ दाभोलकर (वय ८४ वर्षे, सनातनचे ४० वे संत) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांनी त्यांना अर्पण केलेले कवितारूपी शुभेच्छापुष्प !
‘मागील १० वर्षांपासून देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असल्यापासून माझी पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्याशी ओळख आहे. माझा त्यांच्याशी तसा अधिक संपर्क येत नाही, तरीही त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य साधकावर प्रीतीचा वर्षाव करून मला साधनेत साहाय्य केले आहे. ‘पू. दाभोलकरकाका म्हणजे एक सज्जन, सात्त्विक, मनाने निर्मळ, तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही स्थिर रहाणारे, गुरूंप्रती उत्कट भाव इत्यादी दैवी गुण असलेले एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व आहे’, असे मला वाटते. त्यांच्या आठवणीने किंवा आश्रमात येता-जाता मिळणार्या सहवासाने त्यांच्याकडून सूक्ष्मातील चैतन्य मिळते. परिणामी माझ्यातील अहंपणा गळून जातो, तसेच माझ्यावरील रज-तमाचे आवरण अल्प होऊन आनंद मिळतो. पू. दाभोलकरकाका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करतो.
पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! |
पू. दाभोलकरकाका तीव्र आध्यात्मिक त्रासातही आनंदी रहाती ।
आश्रमातील साधकांसाठी तळमळीने आध्यात्मिक उपाय करती ।। १ ।।
पू. दाभोलकरकाका नम्रता अन् साधेपणाचे प्रतीक असती ।
दर्शनी टणक पण अंतरी मृदू, असे दयाघन संत शोभती ।। २ ।।
पू. दाभोलकरकाका सदा सर्वदा नामस्मरणात रंगती ।
आश्रमातील बाल, वयस्कर साधकांचा आधार असती ।। ३ ।।
पू. दाभोलकरकाका भाव, भक्ती अन् श्रद्धा ठेवूनी साधना करती ।
पूर्वपुण्याई, गुरुकृपा अन् साधना यांमुळे झाले आहेत विराजमान संतपदी ।। ४ ।।
पू. दाभोलकरकाका स्वतःस गुरुचरणांचा धुलीकण समजती ।
ते अहंशून्यतेचे अन् गुरूंप्रती भावभक्तीचे एक प्रतीक शोभती ।। ५ ।।
क्षात्रतेज अन् ब्राह्मतेज वाढूनी लवकरच व्हावे विराजमान सद्गुरुपदी ।
कृतज्ञतारूपी साष्टांग नमस्कार करतो पू. दाभोलकरकाकांच्या चरणी ।। ६ ।।
– (पू.) श्री. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे, सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.२.२०२४)
|