रत्नागिरी (जिमाका) – पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ८० कलाकारांच्या भव्यदिव्य ‘शिवबा’ महानाट्याचा प्रयोग पार पडला. तत्पूर्वी कोकण नमन कला मंचच्या वतीने नमन ही पारंपरिक लोककला सादर करण्यात आली.
या महानाट्याने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध झाले.
या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आणि अधिकारी हेही उपस्थित होते.
संत एकनाथांच्या‘दार उघड बया दार उघड बया’ या भारुडापासून या महानाट्याला प्रारंभ होतो. तेराव्या शतकापासूनचा इतिहास मांडत हे कथानक पुढे सरकते. स्वराज्याचे प्रेरणास्थान शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका विशेष अधोरेखित होते. त्यांनी आई तुळजाभवानीच्या साक्षीने स्वराज्याचे पाहिलेले स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने पूर्ण होते. याचे सादरीकरण या महानाट्यात साकारले आहे.