देवाला मनापासून शरण गेलो की तो सर्वकाही आपल्याला देतो ! – ह.भ.प. विनायक आगरकर

राऊत आळी, चिपळूण येथे उत्साहात साजरा होत आहे माघी गणेशोत्सव सोहळा  

चिपळूण – मनुष्याच्या मनाला गजाननाचा (देवाचा) छंद लागायला हवा. त्याच्या स्मरणाने, दर्शनाने सुखाची प्राप्ती होते. ती अवर्णनीय आहे. त्याच्या नावाने आपल्याला जीवनात सुख-समृद्धी ऐश्वर्य लाभते. आपण तन-मन-वाचा याने देवाला शरण गेलो की, तो आपल्याला सर्व काही देतो, असे उद्गार जालगाव (ता. दापोली) येथील ह.भ.प. विनायक आगरकर यांनी कीर्तनसेवेतून काढले. ते राऊत आळी, चिपळूण येथील श्री गणपति मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते. त्यांनी तंजावर प्रांतातील स्वामी गोसावीनंदन महाराज यांच्या  ‘देव गजानन ध्यायी मनुजा । जो स्मरता मज संकट कैची । ते सुख बोलू काही।।’ या अभंगावर निरूपण केले.

ह.भ.प. आगरकर महाराज कीर्तनात पुढे म्हणाले की,

१. देवतांच्या चरित्रावर काही जण अभ्यासाविना टीका करतात; कारण देवतांच्या चरित्रातील शुद्धता पटवून देण्यात आपण न्यून पडतो.

२. भगवंताच्या चरणकमलाशी सुखाची प्राप्ती आहे. क्षमाशीलतेने भगवंताच्या चरणावर डोके ठेवले, तर त्या दर्शनाने त्यातील ऊर्जा आपल्याला मिळते.

३.  नारद आणि भगवंत यातील एका संवादात भगवंत म्हणतात, ‘माझे भक्त जेथे माझे गुणगान करतात, तेथे मी तिष्ठत उभा रहातो.’
प्रतिवर्षीप्रमाणे राऊत आळी येथील श्री गणपति मंदिरात ११ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष श्री. अमोल राऊत, उपाध्यक्ष श्री. किशोर राऊत यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने केले.