अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदु धर्म, हिंदु धर्मातील ग्रंथ आणि त्या ग्रंथांमध्ये असलेले ज्ञान लोकांपर्यंत पोचत आहे ! – राहुल सोलापूरकर, अभिनेते

राहुल सोलापूरकर, अभिनेते

आळंदी (जिल्हा पुणे), ११ फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभरातील संत-महंत येथे येत आहेत. त्या निमित्ताने त्यांचे विचार ऐकण्याचा एक दुर्मिळ योग हिंदू भाविकांना आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदु धर्म, हिंदु धर्मातील ग्रंथ आणि त्या ग्रंथांमध्ये असलेले, कदाचित् हिंदूंना पूर्णपणे आकलन न झालेले ज्ञान या निमित्ताने लोकांपर्यंत पोचत आहे. येथे वेगवेगळे संत आणि स्वामीजी येत असल्यामुळे प्रवचन अन् कीर्तन होत आहे. अयोध्येला भव्य असे श्रीराममंदिर उभे राहिल्यामुळे एक वेगळी चालना हिंदु धर्माच्या कार्यशीलतेला मिळाली आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले.

सोलापूरकर पुढे म्हणाले की, 

१. ‘हिंदु धर्म हा सनातन धर्म आहे’, असे आपण म्हणतो; पण एकही संस्थापक नसलेला, जगाच्या पाठीवरचा असा एकमेव धर्म हिंदु हा नुसता धर्म नसून जगण्याची पद्धती आहे. ही पद्धती साधारणपणे कोरोना महामारीनंतरच्या काळामध्ये जगाला समजली आहे. जे विषय पहिल्यापासून आपल्याकडे होते ते त्यांना आता कळायला लागले आहेत.

२. साध्या भाषेत सांगायचे झाले, तर चप्पल काढून घरात जाणे, हात-पाय धुऊन जेवायला बसणे किंवा कुणालाही हस्तांदोलन न करणे, मिठी न मारता नमस्कार करणे या प्रथा आता जगभरातील, तसेच युरोप, अमेरिका येथील लोकही स्वीकारायला लागले आहेत. त्यांच्या लक्षात आले आहे की, वैज्ञानिकदृष्ट्या विचार करून खर्‍या अर्थाने उभा राहिलेला धर्म हा हिंदु धर्म आहे.

३. अशा वेळेला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची पंचाहत्तरी येणे त्या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन आळंदी सारख्या ठिकाणी ज्याला आपण ‘अलंकापुरी’ही म्हणतो त्या ज्ञानदेवांच्या भूमीमध्ये होणे, हा एक अपूर्व योग आहे. अशा ठिकाणी माझ्यासारख्या एका सामान्य हिंदु कार्यकर्त्याला स्वामीजी स्वतः सन्मानित करत आहेत, हा माझ्यासाठी आशीर्वादच आहे. पुढच्या काळात अजूनही असेच कार्य व्हावे यासाठीची ही शाबासकी आहे, असे मी मानतो.