१. लसूण सोलायची सेवा करत असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या लिखाणाकडे लक्ष जाणे आणि त्यानुसार भावजागृतीचे प्रयत्न करण्याचा विचार मनात येणे
‘७.११.२०२२ या दिवशी मी लसूण सोलायची सेवा करत होते. तेव्हा अकस्मात् माझे लक्ष ‘माझ्याकडे असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे ‘त्रासांची तीव्रता वाढली आहे. त्यासाठी भावजागृतीचे प्रयत्न कसे वाढतील’, याकडे लक्ष द्या !’ अशा आशयाच्या लिखाणाकडे गेले. तेव्हा माझ्या मनात ‘मी भावजागृतीसाठी आणखी काय करू शकते ?’, असा विचार आला.
२. गुरुमाऊलींचे स्मरण करून त्यांची मानसपूजा करणे
तेव्हा मला वाटले, ‘मी प्रतिदिन सकाळी मानसपूजा करतांना गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) चरणी १०८ कमलपुष्पे अर्पण करते. तसा भावजागृतीचा प्रयोग आता लसूण सोलतांना करूया.’ लगेच मी गुरुमाऊलींचे स्मरण केले आणि त्यांची मानसपूजा करू लागले. मी ‘ॐ’चा नामजप करत त्यांच्या चरणी कमलपुष्प अर्पण करू लागले.
३. काही वेळानंतर मला सूक्ष्मातून दिसले, ‘मी ‘ॐ’ म्हटले की, ‘माझ्या हातात ‘ॐ’ दिसत आहे. नंतर त्या ठिकाणी पिवळ्या गुलाबाचे फूल दिसत आहे. ते फूल मी गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करत आहे.’ हे दृश्य मला ५ मिनिटे दिसत होते.
४. भावजागृती होऊन शांत वाटणे
हे दृश्य दिसल्यावर माझी भावजागृती झाली. मला वाटले, ‘भगवंताने माझ्यासाठी किती करावे !, त्याला अंतच नाही. माझी काही पात्रता नसतांना देव मला किती देतो !’ माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. नंतर काही वेळाने मला पुष्कळ शांत वाटू लागले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कृपेने मला हे अनुभवायला आले, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०२२)
|