प्रयागराज – हिंदु राष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील प्रयागराज आणि प्रतापगड येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान करण्यात आले. या अंतर्गत उद्योजक, व्यापारी आणि बुद्धीजीवी वर्ग यांच्यासाठी जनजागृती बैठका अन् व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले. या विविध कार्यक्रमांमध्ये समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
१. ‘हलालमुक्त भारत अभियाना’ला विविध बैठकांच्या माध्यमातून गती
‘हलालमुक्त भारत अभियाना’विषयी विविध ठिकाणी आयोिजत केलेल्या बैठकीत श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी सांगितले की, हलाल (इस्लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणित उत्पादनांची विक्री वाढली, तर गैरहलाल उत्पादनांची विक्री न्यून होते. यामुळे गैरहलाल उत्पादनांचा व्यवसाय करणार्यांना हळूहळू हलाल प्रमाणपत्र घेणे अनिवार्य होईल. हा धोका लक्षात घेऊन हिंदु समाजाने हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात जनजागृती करायला हवी.
२. ‘श्री कटरा रामलीला समिती’ने केला हिंदु जनजागृती समितीचा सत्कार !
प्रयागराज येथील श्री कटरा रामलीला समितीकडून हिंदु जनजागृती समितीचा धर्मकार्यासाठी सत्कार करण्यात आला. हा सत्कार स्वीकारतांना समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी सांगितले की, श्रीराममंदिर पूर्ण होत आहे; परंतु भविष्यात श्रीराममंदिरावर संकट येऊ नये आणि त्याची पवित्रता टिकावी यांसाठी रामराज्य स्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी धर्माचरण आणि उपासना यांद्वारे प्रयत्न करायला हवेत.
३. प्रतापगड येथे पार पडली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
प्रतापगड येथे धर्माभिमानी अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले होते. या सभेला संबोधित करतांना श्री. विश्वनाथ कुलकर्णी म्हणाले, ‘‘भारत हिंदुबहुल आहे; म्हणून देशात सर्व पंथ एकत्रित रहातात. असे असतांना भारतात सनातन धर्माला मान्यता का मिळू नये ? खरे तर भारताला ‘सनातन धर्मियांचा देश, म्हणजेच हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक हिंदूने आठवड्याला किमान १ घंटा धर्मासाठी वेळ द्यायला हवा.’’
या सभेच्या आयोजनात प्रयागराज येथील अधिवक्ता ज्ञानेंद्र मिश्रा, अधिवक्ता करण बहादुर श्रीवास्तव, अधिवक्ता धीरेंद्र श्रीवास्तव, अधिवक्ता अमित सिंह, हिंदुत्वनिष्ठ श्री. विद्यानिवास पांडे, श्री. गोविंद मिश्रा यांनी पुढाकार घेतला.