सिंधुदुर्ग : चोरी झालेले किंवा हरवलेले भ्रमणभाष (मोबाईल) शोधून ते पुन्हा भ्रमणभाषधारकांना मिळवून देण्यासाठी भारत सरकारने Central Equipment Identity Register (CEIR) हे ‘ऑनलाईन पोर्टल’ विकसित केले आहे. भ्रमणभाषची चोरी झाल्यास अथवा भ्रमणभाष हरवल्यास संबंधितांनी https://www.ceir.gov.in या संकेतस्थळाद्वारे उपरोक्त पोर्टलवर ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवल्यावर पोलिसांकडून भ्रमणभाषचा शोध घेऊन तो संबंधितांना परत केला जातो.
त्यामुळे अशा प्रकारे भ्रमणभाष हरवल्यास अथवा त्याची चोरी झाल्यास उपरोक्त पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.
#ceir pic.twitter.com/ENHId5RhGS
— सिंधुदुर्ग पोलीस – Sindhudurg Police (@Sindhudurg_SP) February 2, 2024
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी यापूर्वी केलेल्या आवाहनानुसार आतापर्यंत या पोर्टलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याकडून तांत्रिक अन्वेषण करून त्यांपैकी १०७ भ्रमणभाष शोधण्यात यश आले. यांपैकी एकूण ९ लाख ८० सहस्र रुपये किमतीचे ५० भ्रमणभाष उत्तरप्रदेश, देहली, बंगाल, तेलंगाणा, केरळ आदी राज्यांतून, तसेच महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग पोलिसांनी हस्तगत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस ठाणे या स्तरांवर ३१ जानेवारी या दिवशी कार्यक्रम घेऊन हे भ्रमणभाष संबंधितांना परत करण्यात आल्याचे प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.