‘मला माझ्या वडिलांविषयीचे भूतकाळातील विचार किंवा कष्टदायक प्रसंग आठवायचे आणि त्याविषयीचे विचार पुनःपुन्हा माझ्या मनात यायचे, तसेच कुणी माझ्या समोर किंवा माझ्या मागे मोठ्याने बोलत असेल, तर मला भीती वाटायची किंवा दचकायला व्हायचे.
१. त्रास न्यून होण्यासाठी केलेले प्रयत्न
१ अ. स्वयंसूचना देणे : १९.१०.२०२२ या दिवसापासून मानसोपचार तज्ञांनी सांगितल्यानुसार मी १ मास पुढील स्वयंसूचना दिल्या.
१. ज्या वेळी कुणी माझ्याशी मोठ्या आवाजात बोलेल आणि त्या वेळी मला भीती वाटेल किंवा दचकायला होईल, त्या वेळी मला जाणीव होईल की, भूतकाळात वडिलांच्या संदर्भात घडलेल्या प्रसंगांचा माझ्यावर झालेला हा प्रभाव आहे. वर्तमानात असे घडत नाही. माझ्या समवेत साधक आणि संत आहेत. ते मला आधार देत आहेत; म्हणून मी आत्मविश्वासाने प्रसंगाला सामोरी जाईन.
२. वडिलांचे बालपण, किशोरावस्था आणि विवाहानंतरचे जीवन यांत त्यांच्या संदर्भात अनेक प्रसंग घडले. त्या प्रसंगांत वडिलांना कुणी आधार दिला नाही. नातेवाइकांनीही त्यांना समजून घेतले नाही. वडिलांमधील स्वभावदोष आणि त्यांना असलेला वाईट शक्तींचा त्रास, यांमुळे त्यांचे जीवन कष्टप्रद होते. वडील आजोबांमुळे शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांना संपत्तीत योग्य वाटा मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनावर आघात होऊन त्यांची मानसिक स्थिती बिघडली. मूलतः त्यांच्यात ‘स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, वेळेचे पालन करणे, काटकसर, साधेपणा’, असे अनेक गुण होते. त्यांना असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासामुळे ते रागाने आणि अयोग्य बोलत होते. त्यामुळे मी त्यांना दोष न देता ‘ते त्यांचे आणि माझे प्रारब्ध अन् देवाणघेवाण हिशोब होता’, असे समजून, तसेच वर्तमानात सकारात्मक राहून अधिकाधिक साधना करीन.
१ आ. नामजप करणे : मी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय।’, हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला जप प्रतिदिन १ घंटा २ मास केला.
२. नामजप चालू केल्यावर झालेले त्रास
२ अ. शारीरिक त्रास
२ अ १. डोके जड होणे : अन्य नामजप करत असतांना माझ्याकडून ते सहजतेने होत असत; पण सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला वरील नामजप करत असतांना माझे डोके जड होत असे. त्याविषयी मानसोपचार तज्ञ मला म्हणाल्या, ‘‘एका वेळी १० – १५ मिनिटे नामजप करा. नंतर थोड्या वेळाने पुन्हा १० – १५ मिनिटे नामजप करा. असे करत १ घंटा नामजप पूर्ण करा. हा नामजप मनात येणारे भूतकाळातील विचार दूर करण्यासाठी असल्याने असे होत आहे.’’
२ अ २. २७.१०.२०२२ या दिवशी नामजप करतांना माझे डोके, तसेच अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र यांठिकाणी दुखत होते. मी १ घंटा नामजप केल्यावर मला थोडे बरे वाटू लागले.
२ अ ३. मध्येच एक दिवस रात्री मला झोप लागली नाही.
२ आ. मानसिक त्रास
१. दिवसभर माझ्या मनाला उत्साह जाणवत नसे. ‘काहीच करायला नको’, असे मला वाटत असे.
२. मला भिरभिरल्यासारखे होत असे.
२ इ. बौद्धिक स्तरावर होणारे त्रास : बौद्धिक सेवा करण्यासाठी मला उत्साह वाटत नसे. मला काहीच सुचत नसे.
३. स्वयंसूचना सत्रे करतांना झालेले त्रास
अ. माझ्याकडून अधिकाधिक ४ – ५, एवढीच स्वयंसूचना सत्रे होत होती. तेव्हा ‘सध्याच्या स्थितीला एवढीच सत्रसंख्या असू दे’, असे मानसोपचार तज्ञांनी मला सांगितले.
आ. वरील स्वयंसूचनांचा मूळ विषय आणि त्यांत दिलेले दृष्टीकोन स्वीकारण्यास मला काहीच अडचण नव्हती; परंतु गेल्या ८ दिवसांपासून मला स्वयंसूचना नीट आठवत नव्हत्या. त्या वाचल्यावर त्यांतील शब्द आणि वाक्ये माझ्या लक्षात येत होती.
इ. २७.१०.२०२२ या दिवशी प्रथमच मी सूचना न पहाता मनापासून सूचना देऊ शकले. सूचना देतांना माझ्या मनाला थोडा त्रास होत होता; पण सत्र केल्यावर मला बरे वाटत होते.
४. स्वयंसूचना सत्र करतांना होत असलेल्या विरोधावरून ते करण्याचे महत्त्व लक्षात येणे
मागील ८ दिवसांत ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी अशी सूचनासत्रे करायला सांगून किती कृपा केली !’, असे वाटून मला भरून येत होते. आतापर्यंत ‘सूचनासत्रे करून अशा प्रसंगांतून बाहेर पडता येते’, हे मला ठाऊक नव्हते. स्वयंसूचना सत्र करतांना होत असलेल्या विरोधावरून ते करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
५. त्रासातून बाहेर पडण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि वडील यांना प्रार्थना केल्यावर बरे वाटू लागणे
‘या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करायला हवी’, हे २ दिवसांनी माझ्या लक्षात आले. त्या वेळी मी प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली. नंतर मी माझ्या वडिलांनाही प्रार्थना केली, ‘मी तुमच्या संदर्भातील सूचना देत आहे. या प्रसंगांत तुम्ही उत्तरदायी होता, असे नाही; पण त्या वेळच्या परिस्थितीमुळे मी ‘तुमच्यामुळेच हे झाले’, असे म्हटले. मला क्षमा करा. आता मला त्या सर्व प्रसंगांतून बाहेर पडायचे आहे. तुम्हीही प्रार्थना आणि नामजप करा अन् पुढे जा. कुठेच अडकू नका. मलाही या सर्व प्रसंगांतून बाहेर पडून देवाच्या दिशेने जाऊ द्या.’ त्यानंतर मला थोडे बरे वाटू लागले.
६. स्वयंसूचना सत्रे आणि नामजप केल्यावर जाणवलेले पालट
अ. स्वयंसूचना सत्रे चालू केल्यानंतर २५ दिवसांनी ‘माझ्या डोक्यावरचे ओझे न्यून झाले आहे’, असे मला जाणवले. मला थोडे हलके वाटू लागले.
आ. मला सेवेत आणि साधनेत उत्साह वाटू लागला.
इ. माझ्या वडिलांविषयीचे भूतकाळातील विचार किंवा कष्टदायक प्रसंग आठवणे आणि त्याविषयीचे विचार पुनःपुन्हा माझ्या मनात येणे बंद झाले.
ई. कुणी माझ्या समोर किंवा माझ्या मागे मोठ्याने बोलत असेल, तर मला भीती वाटण्याचे किंवा दचकण्याचे प्रमाण न्यून झाले.
स्वयंसूचना सत्रे चालू केल्यानंतर १ मासाने मानसोपचार तज्ञांना विचारून मी ती सत्रे करणे बंद करून नेहमीप्रमाणे अन्य सूचनासत्रे करणे चालू केले. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप करणे चालू ठेवले. यानंतर १ मासाने सद्गुरु काकांना विचारून हा जपही बंद केला.
एकूणच सत्र करू लागल्यानंतरचा काळ माझ्यासाठी पुष्कळ कठीण होता. मला काहीच सुचत नव्हते. तो दिवाळीचा कालावधी होता. दिवाळीचे दिवस असल्याने आश्रमात साधकसंख्या अल्प असल्याने बौद्धिक सेवेपेक्षा शारीरिक सेवा अधिक करावी लागली. त्या काळात शारीरिक सेवा, उदा. अल्पाहार बनवणे, पणत्या लावणे, पाहुण्यांना आश्रम दाखवणे आणि स्वच्छता करणे इत्यादी करतांना माझ्या मनाला उत्साह वाटत असे. त्यामुळे ‘त्या सेवा करतांना बुद्धीचा अधिक वापर करावा लागत नसल्याने मला होणारा त्रास सहन करणे काही प्रमाणात शक्य झाले’, हेसुद्धा देवाचेच नियोजन होते.’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.५.२०२३)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |