दक्षिणेकडील राज्ये वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार !

बेंगळुरूचे काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश यांची धमकी

बेंगळुरूचे काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश

नवी देहली – केंद्र सरकारने सिंचन प्रकल्पांच्या कर्नाटकच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. दक्षिणेकडील राज्यांकडून जमा होणारा पैसा केंद्र सरकार उत्तरेकडील राज्यांना देत आहे. त्यामुळे निधी वितरणात अन्याय होत आहे. केंद्र सरकारची अशीच प्रवृत्ती कायम राहिल्यास दक्षिणेकडील राज्ये वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी आवाज उठवतील, अशी धमकी काँग्रेसचे बेंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करतांना सुरेश यांनी संसदेबाहेर हे वक्तव्य केले.

डी.के. सुरेश पुढे म्हणाले की,

१. आम्ही केवळ आमच्या हक्काच्या निधीची मागणी करत आहोत. केंद्र सरकार दक्षिण भारतीय राज्यांना ‘जी.एस्.टी’ (वस्तू व सेवा कर) आणि प्रत्यक्ष कर यांचा योग्य वाटा देत नाही.

२. सध्या देशातील विविध राज्यांना निधीचे वितरण योग्य पद्धतीने होत नाही. दक्षिणेकडील राज्यांचा निधी उत्तरेकडील राज्यांमध्ये वळवला जात आहे. हा आमच्यावर अन्याय आहे.

३. केंद्राला आमच्याकडून ४ लाख कोटी रुपये मिळत आहेत आणि त्या मोबदल्यात आम्हाला जे मिळत आहे ते नगण्य आहे.

४. पंधराव्या वित्त आयोगाने शिफारस केलेले अनुदान राज्याला मिळालेले नाही, असेही डी.के. सुरेश यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसने अखंड हिंदुस्थानचे तुकडे करण्याविना दुसरे काय केले आहे ? वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार्‍यांना आता जनतेनेच घरी बसवायला हवे ! देशाचे आणखी तुकडे न होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य !
  • अशा प्रकारे फुटीरतेचे बीज पेरू पहाणार्‍या आणि त्या माध्यमातून सार्वभौम भारताला आव्हान निर्माण करणार्‍या अशा खासदारांच्या आता मुसक्याच आवळ्या पाहिजेत. काँग्रेस पक्षही त्यांच्या या वक्तव्याला विरोध करत नाही, यातून तोही अशा राष्ट्रद्रोही वक्तव्याला समर्थन देत आहे, हे लक्षात घ्या !