कोथरूड (पुणे) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य पालखी सोहळा पार पडला !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभु श्रीरामचद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा समस्त हिंदू समाजासाठी ऐतिहासिक क्षण होता. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा), कोथरूड येथे ‘स्वारद फाउंडेशन’ यांच्या प्रेरणेतून सकल हिंदू समाजाद्वारे भव्य अशा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिणमुखी मारुति मंदिरात मारुतिरायांच्या मूर्तीचे पूजन करून पालखी सोहळ्याला आरंभ करण्यात आला होता. पालखी सोहळ्यामध्ये सहस्रो हिंदू सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमीही यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

प्रभु श्रीरामांच्या पालखीचे अनेक मंडळांनी स्वागत केले. पालखी मार्गावर भगवे ध्वज, भगव्या पताका, तसेच रांगोळी काढून मार्ग सुशोभित करण्यात आला होता.

शेकडो हिंदु बांधवानी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा नामजप करत आणि श्रीरामांचा जयघोष करत, ‘समर्थ मित्र मंडळ’ येथील आई दुर्गादेवीच्या मंदिरात बहुसंख्येने उपस्थित हिंदु बांधवांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शपथ घेतली अन् हिंदुत्वाच्या कार्यामध्ये सक्रीय सहभागी होण्याचा संकल्प करून पालखी सोहळ्याची सांगता केली.