झेंडा काढण्याची भाजपने केली होती मागणी !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील मंड्या येथील १०८ फूट उंच खांबावरील हनुमानाचे चित्र असलेला भगवा ध्वज पोलिसांनी काढल्याच्या घटनेचे प्रकरण अद्याप ताजे असतांना बेंगळुरूच्या शिवाजीनगरमध्ये हिरवा झेंडा लावल्याची घटना समोर आली आहे. भाजपने हा हिरवा झेंडा हटवण्याची मागणी केल्यानंतर महापालिकेने तो हटवला आहे.
१. भाजपचे विजयपुराचे आमदार बसनागौडा पाटील यत्नाळ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून ही मागणी केली होती. यात त्यांनी बेंगळुरूचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना ‘टॅग’ (सूचित करणे) करत विचारले होते की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शत्रूदेशाच्या रंगासारखा ध्वज फडकावणे आपल्या ध्वज संहितेच्या विरोधात नाही का ? हा ध्वज त्वरित हटवून तेथे राष्ट्रध्वज फडकवावा. शिवाजीनगर पाकिस्तानात नाही, तर भारतात आहे.
२. पोलीस आणि बेंगळुरू महानगरपालिका यांनी यानंतर कारवाई करत हिरवा ध्वज हटवला आहे. स्थानिक मुसलमान नेत्यांनाही यासंदर्भात कळवण्यात आले आहे.
३. काही मुसलमानांनी या कारवाईला आक्षेप घेत हा झेंडा गेल्या ३० वर्षांपासून फडकत असल्याचे सांगितले; मात्र ही कारवाई नियमानुसार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील मंड्या येथे १०८ फूट उंच खांबावरील हनुमानाचे चित्र असलेला भगवा ध्वज पोलिसांनी स्वतःहून हटवला; मात्र बेंगळुरू येथे मागील ३० वर्षे हिरवा ध्वज फडकत असतांना प्रशासन आणि पोलीस यांनी बघ्याची भूमिका घेतली होती, हे संतापजनक ! |