उत्तरप्रदेश पोलीस इस्रालयकडून १० ड्रोन विरोधी यंत्रणा खरेदी करणार !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी इस्रायलची ड्रोन विरोधी यंत्रणा वापरली जाणार आहे. उत्तरप्रदेश पोलीस इस्रायलकडून १० ड्रोन विरोधी यंत्रणा खरेदी करणार आहेत. त्याची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. अयोध्येसह मथुरा, वाराणसी, लक्ष्मणपुरी यांसारख्या अतीसंवेदनशील ठिकाणी ही यंत्रणा बसवली जाणार आहे.
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी ड्रोन विरोधी यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. उत्तरप्रदेश पोलिसांनी ही यंत्रणा राष्ट्रीय सुरक्षा दल आणि विशेष संरक्षण गट यांच्याकडून तात्पुरत्या वापरासाठी घेतली होती; मात्र आता उत्तरप्रदेश पोलिसांनी ही यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक चाचण्यांनंतर इस्रायलच्या ड्रोन विरोधी यंत्रणा खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
कशी आहे ड्रोन विरोधी यंत्रणा ?
ड्रोन विरोधी यंत्रणा ३ ते ५ कि.मी.च्या अंतरातील कोणतेही ड्रोन क्षणात नष्ट करू शकते. या यंत्रणेत कोणतेही ड्रोन ओळखण्याची क्षमता आहे. ही लेझर आधारित प्रणाली आहे जी ड्रोन शोधून नष्ट करू शकते. यामुळे सुरक्षायंत्रणांना शत्रूच्या ड्रोनची माहिती योग्य वेळी मिळते आणि योग्य ती कारवाई करता येते. एवढेच नाही, तर शत्रूच्या ड्रोनवर नियंत्रण मिळवण्याची क्षमताही या प्रणालीमध्ये आहे. या प्रणालीखेरीज ‘स्नायपर’ तैनात करण्यात येत आहेत, जे कोणत्याही ड्रोनला लक्ष्य करू शकतात आणि नष्ट करू शकतात. स्नायपर म्हणजे प्रशिक्षित सैनिक किंवा पोलीस अधिकारी. तो दूरवरून अत्यंत अचूकपणे बंदुकीने निशाणा साधू शकतो.