खोपोली येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
अंजरून (खोपोली) – अयोध्येत श्रीराममंदिर होण्यासाठी आपल्याला ५०० वर्र्षांहून अधिक काळ वाट पहावी लागली. काशी आणि मथुरा मुक्त होऊन तेथेही मंदिर निर्माण व्हावे, यासाठी देशातील प्रत्येक हिंदु आतुरतेने वाट पहात आहे. देशात श्रीराममंदिर तर बांधले आहे, आता ‘रामराज्य’ अर्थात् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील व्हायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने खोपोली येथील अंजरून गावातील श्री भैरवनाथ मंदिरात २६ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
या सभेचा प्रारंभ शंखनाद आणि वेदमंत्रपठण यांनी झाला. यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी समितीचे श्री. सुनील कदम यांनी सांगितले. या सभेला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते. श्री भैरवनाथाच्या साक्षीने हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार या वेळी अंजरून येथील ग्रामस्थांनी केला.
श्री. सतीश कोचरेकर पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंना आता केवळ जन्महिंदु नव्हे, तर कर्महिंदु व्हावे लागणार आहे. अयोध्येत श्रीराम विराजमान होत असतांना देशात विविध ठिकाणी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली. अशा आक्रमणांना तोंड देण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम झाले पाहिजे. त्यासाठी समितीच्या वतीने चालवल्या जाणार्या विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी व्हा.’’
ही सभा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. या वेळी महिला, युवती, तसेच गावातील तरुण उपस्थित होते.